अमोनियम क्लोराईडच्या कामादरम्यान सुरक्षा साहित्य न दिल्याचा आरोप; कामगारांना उपचार खर्च व नुकसानभरपाईचे धनादेश
कवठेमंकाळ | प्रतिनिधी
कवठेमंकाळ तालुक्यातील खरसिंग येथे असलेल्या एका केमिकल कंपनीच्या गोडाऊनमध्ये काम करताना काही कामगारांची प्रकृती बिघडल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात शिवसेना सांगली उपजिल्हाप्रमुख तथा कामगार नेते हरिदास लेंगरे यांच्या पाठपुराव्यानंतर संबंधित कामगारांना उपचाराचा खर्च आणि एक महिन्याच्या पगाराएवढी नुकसानभरपाई देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खरसिंग येथील केमिकल गोडाऊनमध्ये ट्रकद्वारे माल आल्यानंतर नाक्यावरून कामगारांना बोलावून माल हाताळण्याचे काम दिले जाते. दि. १९ जून २०२६ रोजीही काही कामगारांना कामासाठी बोलावण्यात आले होते. नेहमीच्या केमिकलऐवजी यावेळी अमोनियम क्लोराईडच्या सुमारे ५०० किलोच्या बॅगा आल्या होत्या. या मोठ्या बॅगमधील रसायन ५० किलोच्या बॅगमध्ये भरण्याचे काम कामगारांकडून करून घेण्यात आल्याचा आरोप आहे.
कामगारांच्या म्हणण्यानुसार, हे काम करताना त्यांना कोणतेही सुरक्षा साहित्य (सेफ्टी किट) उपलब्ध करून देण्यात आले नव्हते. काम सुरू झाल्यानंतर काही वेळातच अनेक कामगारांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर हात-पायांवर फोड येणे, तीव्र वेदना होणे अशी लक्षणे दिसून आली.
प्रकृती बिघडल्यानंतर कामगारांनी गोडाऊन मालकाकडे वैद्यकीय उपचारासाठी मदत किंवा आर्थिक सहाय्याची मागणी केली. मात्र, अपेक्षित मदत मिळाली नसल्याने संबंधित कामगारांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा कामगार नेते हरिदास लेंगरे यांची भेट घेऊन संपूर्ण घटना सांगितली.
याबाबत हरिदास लेंगरे यांनी तातडीने गोडाऊन मालकाशी संपर्क साधून कामगारांच्या प्रश्नाबाबत पाठपुरावा केला. त्यानंतर संबंधित कामगारांना उपचाराचा खर्च तसेच एक महिन्याच्या पगाराएवढी नुकसानभरपाई देण्यात आली. ही रक्कम प्रत्येक कामगाराला स्वतंत्र धनादेशाद्वारे देण्यात आली असून, त्यांनी बँकेतून धनादेश वटविल्याचे सांगण्यात आले.
या घटनेनंतर कामगारांनी हरिदास लेंगरे यांचे आभार व्यक्त केले. विजयनगर चौक येथील त्यांचे कार्यालय हे अन्यायग्रस्त, शोषित आणि वंचित कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आधारस्थान ठरत असल्याची भावना कामगारांनी व्यक्त केली.

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.