⚡ ब्रेकिंग News

मुंबई महापालिका आयुक्तपदासाठी पाच नावांची जोरदार चर्चा; अश्विनी भिडे आणि मिलिंद म्हैसकर आघाडीवर, कोण मारणार बाजी?

‘मेट्रो वूमन’ अश्विनी भिडे व डॉ. मिलिंद म्हैसकर यांच्यात मुख्य चुरस; अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार

मुंबई: मुंबई महानगरपालिका (BMC) आयुक्तपदासाठी वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांमध्ये चुरस वाढली आहे. या महत्त्वाच्या पदासाठी सध्या पाच प्रमुख नावांची जोरदार चर्चा रंगली असून, त्यात अश्विनी भिडे आणि डॉ. मिलिंद म्हैसकर यांची नावे आघाडीवर असल्याचे सूत्रांकडून समजते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव आणि मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे (१९९५ बॅच) तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. मिलिंद म्हैसकर (१९९२ बॅच) या दोघांमध्ये मुख्य स्पर्धा असल्याचे चित्र आहे. दोघांपैकी एकाची निवड होण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे.

इतर चर्चेत असलेली नावे म्हणजे महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी आणि नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता. याशिवाय सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांचे नाव सुरुवातीला चर्चेत होते. मात्र, त्यांची दिल्लीतील महत्त्वाच्या पदावर प्रतिनियुक्ती होण्याची शक्यता असल्याने त्यांच्या संधी कमी झाल्याचे मानले जात आहे.

अश्विनी भिडे यांना ‘मेट्रो वूमन’ म्हणून ओळखले जाते. मुंबई मेट्रो प्रकल्पात त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्या कार्याचे वेळोवेळी कौतुक केले आहे. दुसरीकडे, डॉ. मिलिंद म्हैसकर हे अनुभवी प्रशासक असून, सार्वजनिक बांधकाम विभागातील विविध महत्त्वाच्या प्रकल्पांचे नेतृत्व त्यांनी केले आहे.

जर अश्विनी भिडे यांना मुख्यमंत्री कार्यालयातच पुढील जबाबदारी दिली गेली आणि मेट्रो प्रकल्प त्यांच्याकडेच राहिला, तर मिलिंद म्हैसकर यांच्या नावाला अधिक प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे.

अंतिम निर्णय कोण घेणार? 

मुंबई महापालिका आयुक्तपदाच्या निवडीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार असून, त्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा होणार आहे. नगरविकास खाते एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत असल्याने आणि महापालिकेत भाजप-शिवसेना युती सत्तेत असल्याने शिंदे यांच्या मताला विशेष महत्त्व दिले जाणार आहे.

मुंबईसारख्या देशातील सर्वात मोठ्या महानगरपालिकेच्या प्रशासनाचे नेतृत्व कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रशासनातील अनुभव, कार्यक्षमता आणि सध्याच्या जबाबदाऱ्यांचा विचार करून सरकार कोणता निर्णय घेते, याकडे प्रशासन आणि मुंबईकरांचे लक्ष आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...