⚡ ब्रेकिंग News

'पाच मिनिटं झोपतो' म्हणून डोळे मिटले, आई उठवायला गेली अन् कायमचाच धक्का; लोकप्रिय रीलस्टार अरुण तुपेचा अचानक मृत्यू

 


'पाच मिनिटं झोपतो' म्हणून डोळे मिटले, आई उठवायला गेली अन् कायमचाच धक्का; लोकप्रिय रीलस्टार अरुण तुपेचा अचानक मृत्यू

शूटसाठी येणार होता, मित्राने फोन उचलून सांगितलं - 'अरुण आता कधीच पोहोचू शकणार नाही'; शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा

छत्रपती संभाजीनगर: सोशल मीडियावर झळकणाऱ्या प्रत्येक क्षणाचं वेगळंच वलय असतं, पण कधी कधी हे क्षण कायमचे थांबून जातात. छत्रपती संभाजीनगरमधील लोकप्रिय रीलस्टार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अरुण तुपे याच्या अचानक मृत्यूने संपूर्ण शहरावर शोककळा पसरली आहे. तरुणाईत अतिशय लोकप्रिय असलेल्या अरुणने काही तासांपूर्वीच शेवटची रील शेअर केली होती; मात्र दुसऱ्याच दिवशी सकाळी तो कायमचा झोपी गेला.

कसं घडलं प्रकरण?

अरुण नेहमीप्रमाणे सकाळी 6 वाजता उठला. त्यानंतर तो पुन्हा झोपायच्या तयारीत होता. 'थोडा वेळ परत झोपतो' असे म्हणत त्याने डोळे मिटले; पण ही झोप कायमचीच ठरली. काही वेळाने आईने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र अरुणकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. घाबरलेल्या कुटुंबीयांनी त्याला तातडीने खासगी क्लिनिकमध्ये नेले. तेथील डॉक्टरांनी परिस्थिती गंभीर असल्याचे सांगत घाटी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला; पण तोपर्यंत अरुणने प्राण सोडले होते.

शूटसाठी येणार होता, फोनवरून मिळाला धक्का

मंगळवारी सकाळी 10 वाजता अरुणचे एका कॅफेचे प्रमोशनल शूट ठरले होते. त्याचा सिनेमॅटोग्राफर सकाळी साडेदहाच्या सुमारास त्याला फोन लावून शूटची आठवण करून देत होता. मात्र, फोन अरुणच्या मित्राने उचलला. तो म्हणाला, "अरुण आता कधीच पोहोचू शकणार नाही..." सुरुवातीला मित्राला वाटलं की ही नेहमीची चेष्टा असावी; पण काही क्षणातच वास्तवाची जाणीव झाली. अरुण खरोखरच कायमचा निघून गेला होता.

शेवटची रील आणि सामान्य कुटुंबातील संघर्ष

मृत्यूच्या अवघ्या 24 तासांपूर्वी अरुणने आकाशवाणी परिसरात व्हायरल गाण्यावर एक रील शूट करून ती सोशल मीडियावर शेअर केली होती. हीच त्याची शेवटची पोस्ट ठरली. अरुण हा कष्टकरी कुटुंबातील होता. त्याची आई शिवणकाम करते, तर वडील साऊंडचा व्यवसाय करतात. स्वबळावर पुढे आलेल्या या तरुणाने प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही पाय जमिनीवरच ठेवले होते. नवोदित कंटेंट क्रिएटर्सना तो मार्गदर्शन करायचा, कोणाचेही मन दुखावले नाही, अशी आठवण त्याचे बालपणीचे मित्र ऋतुराज आरट यांनी सांगितली.

शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शवविच्छेदनानंतर विश्लेषणासाठी व्हिसेरा जतन करण्यात आला आहे. डॉक्टरांच्या प्राथमिक अहवालात मृत्यूचे कारण राखून ठेवण्यात आले असून, अंतिम अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होईल.

खेरचा निरोप

अरुण तुपेच्या मृत्यूने सोशल मीडियावर शोककळा पसरली असून, त्याचे जुने व्हिडीओ पुन्हा शेअर केले जात आहेत. मंगळवारी सायंकाळी फुलंब्रीतील मूळ गावी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मित्रमंडळी, नातेवाईक आणि चाहत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अरुणला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...