व्हीआयपी प्रवासासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे; दबाव आणल्यास वैमानिक थेट नकार देऊ शकणार; बारामती अपघातानंतर घेण्यात आला निर्णय
नवी दिल्ली : बारामती येथे झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाल्यानंतर विमान वाहतूक सुरक्षेतील नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी (मुख्यमंत्री, राज्यपाल इत्यादी) यांना घेऊन जाणाऱ्या अनियोजित विमान आणि हेलिकॉप्टर ऑपरेटर्ससाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या नियमांमुळे आता वैमानिकांवर कोणताही राजकीय दबाव येणार नाही, याची खात्री करण्यात आली आहे.
‘वैमानिक थेट नकार देऊ शकतो’
डीजीसीएने स्पष्टपणे नमूद केले आहे की उड्डाण कर्मचाऱ्यांवर कोणताही दबाव आणला जाऊ नये, जेणेकरून सुरक्षेशी तडजोड होणार नाही. नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, व्हीआयपींच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शेवटच्या क्षणी होणारे बदल केवळ ऑपरेटर व्यवस्थापनामार्फतच करता येतील. हवामानाच्या नियमांचे पालन करणे अनिवार्य असून कर्मचाऱ्यांच्या निर्णयांचा आदर केला जाईल.
सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे – आता जर कोणत्याही नेत्याने किंवा व्हीआयपीने वैमानिकावर दबाव आणला, तर वैमानिक थेट उड्डाणास नकार देऊ शकतो. या प्रकरणाची संपूर्ण जबाबदारी व्यवस्थापनाची असेल, वैयक्तिक वैमानिकाची नव्हे. नवीन नियमांमुळे व्हीआयपींच्या सततच्या प्रवासामुळे वैमानिकांना थकवा येणार नाही, याचीही खात्री करण्यात आली आहे.
बारामती अपघातानंतर झाली सुधारणा
२८ जानेवारी रोजी बारामती विमानतळावर झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर विमान सुरक्षा नियमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यानंतर डीजीसीएने व्हीआयपी प्रवासासंबंधीच्या नियमांमध्ये आवश्यक सुधारणा करत ही नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
अपघातात ‘गुन्हेगारी कट’चा आरोप; बंगळूरमध्ये झिरो एफआयआर दाखल
दरम्यान, बारामती विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे व राष्ट्रवादी काँग्रेस (सपा) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी बंगळूरमध्ये झिरो एफआयआर दाखल केला आहे. त्यांनी या अपघातामागे ‘गुन्हेगारी कट’ असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
रोहित पवार यांनी एफआयआरमध्ये पाच मुख्य आरोप केले आहेत :
विमानाने अधिकृत नोंदीनुसार ४,९१५ तास उड्डाण केले होते, तर प्रत्यक्षात ८,००० तासांहून अधिक उड्डाण केल्याचा दावा
कमी दृश्यमानता असूनही व्हिज्युअल फ्लाईट नियमांनुसार विमानाला उतरण्याची परवानगी
ऐनवेळी क्रू बदलण्यात आला; पायलट सुमित कपूर यांचा समावेश
अपघातापूर्वी व्हीएसआर व्हेंचर्सने पायलट सुमित कपूर यांच्या नावाने जीवन विमा पॉलिसी काढली
पायलट सुमित कपूर यांना यापूर्वी दारूशी संबंधित गुन्ह्यांसाठी निलंबित करण्यात आले होते
रोहित पवार यांनी मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशन, बारामती पोलिसांसह महाराष्ट्र सीआयडीकडे तक्रार केली होती. मात्र कोणतीही कारवाई न झाल्याने २३ मार्च रोजी बंगळूरमध्ये झिरो एफआयआर दाखल करण्यात आला. कर्नाटक पोलिसांनी हा गुन्हा नोंदवून तो महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग केला आहे.
एएआयबीचा प्राथमिक अहवाल : झाडांवर आदळल्याने अपघात
विमान अपघात तपास ब्युरोने (AAIB) या अपघाताचा २२ पानी प्राथमिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. अपघातस्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एएआयबीने म्हटले आहे की, अपघात होण्यापूर्वी विमान उजवीकडे वळले, झाडांवर आदळले आणि नंतर जमिनीवर कोसळले. यामुळे लागलेल्या आगीत कॉकपिट आणि केबिन पूर्णपणे जळून खाक झाले.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.