‘प्रत्येक क्षणी उणीव जाणवते, पण तुमचे विचारच मार्गदर्शक’ – उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या भावना
मुंबई : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाला आज (२८ मार्च) दोन महिने पूर्ण झाले. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती विमानतळावर झालेल्या या दुर्दैवी अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर दोन महिन्यांच्या काळातही राजकीय क्षेत्रासह जनमानसातील वेदना कमी झालेल्या नसताना, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांना उद्देशून एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
प्रत्येक क्षणी जाणवते तुमची उणीव’
सुनेत्रा पवार यांनी आपल्या भावना व्यक्त करताना लिहिले, “दादा, आज तुम्हाला जाऊन दोन महिने पूर्ण झाले. काळ पुढे सरकतोय, पण मन अजूनही तुमच्याच आठवणींमध्ये गुंतून राहिले आहे. प्रत्येक क्षणी तुमची उणीव प्रकर्षाने जाणवते आणि त्याचवेळी दैनंदिन राजकीय व सामाजिक कामकाजात तुमचे अस्तित्वही जाणवत राहते.”
अजित पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या सुनेत्रा पवार यांनी पुढे लिहिले, “तुमच्यातील लोकाभिमुख – विकासाभिमुख व्यक्तिमत्त्व, सर्वसामान्यांशी असलेली जिव्हाळ्याची नाळ, कामासाठीची झपाटलेली वृत्ती आणि प्रत्येक निर्णयामागची दूरदृष्टी हे सगळेच मला कायम मार्गदर्शन करण्याचे काम करतील.”
‘तुम्ही केवळ नेते नव्हता, तर आधारस्तंभ होता’
सुनेत्रा पवार म्हणाल्या, “तुम्ही केवळ एक नेते नव्हता, तर असंख्य लोकांच्या आयुष्यात विश्वास, बळ आणि आशा निर्माण करणारे आधारस्तंभ होता. तुमच्यामुळे अनेकांना दिशा मिळाली, संधी मिळाली आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद मिळाली.”
‘शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवरच वाटचाल’
अजित पवार यांच्या प्रेरणेनेच पक्षाची वाटचाल सुरू असल्याचे सांगताना त्या म्हणाल्या, “शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर चालणाऱ्या आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराची वाटचाल तुमच्या प्रेरणेनेच अखंड सुरू आहे. लोककल्याणासाठी निर्णय घेताना या परिस्थितीत तुम्ही काय केले असते, हा विचार मनात ठेवून मी प्रत्येक पाऊल उचलण्याचा प्रयत्न करते.”
तुमची उणीव शब्दांत मांडणे अशक्य
आपल्या भावनिक पोस्टच्या शेवटी सुनेत्रा पवार यांनी लिहिले, “तुमच्या अनुपस्थितीत निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही, ही जाणीव मनाला कायम टोचत राहते. पण तुम्ही दिलेली शिकवण, तुमचे विचार आणि तुमचा वारसा हेच आता पुढचा मार्ग उजळवणारे दीप आहेत. तुमच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण, प्रत्येक संवाद आणि प्रत्येक आठवण मनात कायमची कोरलेली आहे. दादा, तुमची उणीव शब्दांत मांडणे अशक्य आहे. पण तुमची स्वप्ने, तुमचे कार्य आणि तुमचे विचार पुढे नेण्याचा निर्धार मी कायम मनाशी जपेन.”
दरम्यान, या अपघाताच्या तपासासाठी अजित पवार यांचे पुतणे व आमदार रोहित पवार यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विधानसभेत स्पष्ट केले होते की, हा अपघात जर घातपात असेल तर कोणालाही सोडले जाणार नाही. अपघाताच्या तपासासाठी बंगळूरमध्ये झिरो एफआयआर दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.