परभणी जिल्हा परिषदेत मोठा राजकीय डाव; भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादीची महाएकजुट, २४ आमदार ठाण्यात
अध्यक्षपदासाठी शिंदे गटाला ऑफर; उपाध्यक्ष पद राष्ट्रवादीकडे, सभापती पद ठाकरे गट आणि काँग्रेसकडे?
परभणी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वी राजकीय रंगत चांगलीच पेटली आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मोठी राजकीय खेळी करत अपक्ष आणि इतर पक्षांना एकत्र आणण्यात यश मिळवले आहे. येत्या १८ मार्च रोजी होणाऱ्या या निवडणुकीपूर्वी परभणीच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडताना दिसत आहे.
परभणी जिल्हा परिषदेत एकूण ५४ सदस्य असून बहुमतासाठी २८ सदस्यांची आवश्यकता आहे. सध्या भाजपकडे २४, राष्ट्रवादी काँग्रेसकडे १५, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेकडे ६, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे ५, काँग्रेसकडे ३ आणि १ अपक्ष सदस्य आहे. भाजपकडे सर्वाधिक जागा असल्या तरी बहुमतासाठी त्यांना आणखी चार सदस्यांची गरज आहे. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी यापूर्वी शिंदे गटाच्या मदतीने सत्ता स्थापन करण्याचा दावा केला होता. मात्र राष्ट्रवादीने भाजपचा हा डाव फोडण्यासाठी रणनीती आखली आहे.
राष्ट्रवादीचे निमंत्रण, शिंदे गटाला अध्यक्षपदाची ऑफर?
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीने शिंदे गटाच्या शिवसेनेला जिल्हा परिषद अध्यक्षपद देण्याची ऑफर दिली आहे. या प्रस्तावानुसार उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे राहील, तर विविध सभापती पदे उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसला देण्याचे संभाव्य समीकरण आखण्यात आले आहे. या डावपेचांमुळे भाजपसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
ठाण्यात हॉटेलमध्ये २४ सदस्य एकत्र
राष्ट्रवादीने केवळ राजकीय समीकरणेच आखली नसून संख्याबळही एकत्र केल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीचे १५, उद्धव ठाकरे गटाचे ६, काँग्रेसचे २ आणि १ अशा एकूण २४ सदस्यांना सध्या ठाण्यातील एका हॉटेलमध्ये थांबवण्यात आले आहे. तर शिंदे गटाचे ५ सदस्य मुंबईत पोहोचण्याची शक्यता असून ते देखील या आघाडीत सहभागी झाल्यास एकूण २९ सदस्यांचे बहुमत राष्ट्रवादीच्या बाजूने जाऊ शकते.
भाजपचा प्रतिडाव शक्य
दरम्यान, या घडामोडींनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील नेते आणि शिंदे गटाच्या तीनही जिल्हाप्रमुखांची बैठक पार पडल्याची माहिती आहे. या बैठकीत सत्तासमीकरणांवर चर्चा झाली. राष्ट्रवादीच्या या हालचालीमुळे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासह भाजप नेतृत्वासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप हा डाव उधळून लावणार की राष्ट्रवादी आपली रणनीती यशस्वी करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.