मुंब्रा खळबळ: सोशल मीडिया इन्फ्लुएंसर बाबा खानच्या घराबाहेर गोळीबार; पोलिसांवरच हल्ला, एक जण अटक
ठाण्याच्या मुंब्रा-कौसा भागात पहाटेची सनसनाटी घटना; दुसरा आरोपी फरार
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा-कौसा परिसरात शनिवारी पहाटे सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि बांधकाम व्यावसायिक नदीम मोइनुद्दीन खान उर्फ बाबा खान (वय 45) यांच्या घराबाहेर गोळीबाराची खळबळजनक घटना घडली. अज्ञात हल्लेखोरांनी केवळ बाबा खान यांच्या गाडीवर गोळीबार केलाच नाही, तर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांवर देखील गोळीबार केल्याने एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे पावणे पाचच्या सुमारास हल्लेखोरांनी अंधाराचा फायदा घेत बाबा खान यांच्या घरासमोर येऊन त्यांच्या कारवर गोळी झाडली. या गोळीने कारचे किरकोळ नुकसान झाले. त्यानंतर दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने आरोपींनी हवेतही दोन गोळ्या झाडल्या.
घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलिसांचा एक चमू तातडीने घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी पोलिसांवर देखील दोन राऊंड फायरिंग केले. या गोळीबारात दोन जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना तातडीने काळसेकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी तात्काळ सर्च ऑपरेशन सुरू करून शहाबाद उर्फ शंभू मुन्ना शमशाद कुरेशी (वय 28) या एका आरोपीला अटक केली आहे. तर या घटनेतील दुसरा आरोपी फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची टीमरात्र कार्यरत आहे. घटनास्थळी मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.
दरम्यान, बाबा खान यांनी यापूर्वीही आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याचा दावा केला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून, त्यात ते हल्लेखोरांवर संताप व्यक्त करताना दिसत आहेत. मुंब्रा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून गोळीबारामागील कारणांचा सखोल तपास सुरू केला आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.