शिंदे गटात मुस्कटदाबीविरोधात आक्रमक पवित्रा; नाशिक-रायगडनंतर साताऱ्यातील घटनेने वेळीच सावध होण्याची आमदारांची कुजबूज सुरू
भाजपकडून २०२९ च्या निवडणुकीसाठीचा डाव असल्याची शिंदे गटातील आमदारांची भूमिका; पोलीस अधीक्षकांचा मुद्दा शिवसेना लावून धरणार, कोणत्याही स्थितीत माघार नसल्याचे स्पष्ट
नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना शिंदे गटाला जो अनुभव आला, त्यानंतर आता साताऱ्यात थेट मारहाण सहन करावी लागल्याने शिंदे गटात मोठी अस्वस्थता पसरली आहे. मित्रपक्षाकडून मिळत असलेल्या वागणुकीविरोधात शिवसेना शिंदे गटाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज (२३ मार्च) विधानपरिषदेत या घटनेचे पडसाद उमटले असून, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीतील भाजपच्या कारनाम्यानंतर शिंदे गटातील आमदारांनी वेळीच सावध होण्याची कुजबूज सुरू केली आहे.
उपसभापतींची कारवाई; भाजप अडचणीत?
साताऱ्यात घडलेल्या प्रकाराची गंभीर दखल घेत विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सातारा पोलीस अधीक्षकांना निलंबित करण्याचे निर्देश दिले. तसेच या प्रकरणी पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी लक्ष घालण्याचे सांगितले असून, सीसीटीव्ही फुटेज एकत्रित करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
नियमानुसार, उपसभापतींनी सभागृहात पीठासीन अधिकारी म्हणून दिलेला निर्णय सभापती सामान्यतः बदलू शकत नाहीत. उपसभापती सभागृहाचे कामकाज चालवत असताना त्यांना सभापतींप्रमाणे सर्व अधिकार असतात. त्यामुळे उपसभापतींच्या या निर्णयामुळे भाजपसमोर अडचण निर्माण झाली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
भाजपही आक्रमक; सातारा मुद्द्यावर माघार नाही
दुसरीकडे, उपसभापतींच्या या कारवाईनंतर भाजपनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. कोणत्याही परिस्थितीत साताऱ्याच्या मुद्द्यावरून माघार घेणार नसल्याची भूमिका भाजपने स्पष्ट केली आहे. मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानपरिषदेत शंभूराज देसाई यांच्या वर्तनावर बोट ठेवत पोलीस अधीक्षकांवरील कारवाईला विरोध केला.
शिंदे गटातील आमदारांची कुजबूज
नाशिक, रायगडनंतर आता साताऱ्यात मित्रपक्षाकडून ज्या पद्धतीने वागणूक मिळत आहे, त्याविरोधात शिवसेना शिंदे गटातील आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आमदारांकडून आपापल्या जिल्ह्यात मित्रपक्षाकडून होत असलेली मुस्कटदाबी उपमुख्यमंत्र्यांकडे मांडण्यात येणार असल्याची माहिती आहे.
भाजपकडून २०२९ च्या निवडणुकीसाठी हे सगळे डाव सुरू असल्याची कुजबूज शिवसेना आमदारांमध्ये सुरू झाली आहे. साताऱ्यात जे घडले त्याची पुनरावृत्ती इतर जिल्ह्यांमध्येही होऊ शकते, अशी भीतीही या आमदारांना वाटू लागली आहे.
पोलीस अधीक्षकांचा मुद्दा तापणार
पोलीस अधीक्षकांचा मुद्दा आता चांगलाच तापण्याची चिन्हे आहेत. हा मुद्दा शिवसेना लावून धरणार असल्याची माहिती समोर आली आहे. कोणत्याही स्थितीत हा मुद्दा सोडणार नसल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले आहे. उपसभापतींच्या निर्णयाला सभापतीकडे अपील करता येत नसल्याने, हा निर्णय त्यावेळी अंतिम मानला जातो. मात्र, हा निर्णय कायदेशीर किंवा घटनात्मक नियमांच्या विरोधात असल्यास तो न्यायालयीन पुनरावलोकनाचा विषय होऊ शकतो, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.