अनेक वर्षांच्या खंडानंतर महाराष्ट्रात पुन्हा 'लोडशेडिंग'चा धक्का; दररोज 'इतके' तास जाणार लाईट
तापमान वाढीसह वीजमागणीत वाढ; सौरऊर्जा बंद झाल्याने संध्याकाळी संकट; गळती असलेल्या गावांना फटका
मुंबई : महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केलेले दावे आणि आश्वासने धुळीला मिळवत अनेक वर्षांच्या खंडानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा भारनियमन (लोडशेडिंग) सुरू झाले आहे. शुक्रवारच्या संध्याकाळपासून सुरू झालेले हे भारनियमन शनिवारी संध्याकाळीही करण्यात आले. महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, राज्यात तापमान वाढत असल्याने विजेची मागणी वाढली असून, पुरवठा करणे कंपनीला शक्य होत नाही. परिणामी, दररोज तीन ते चार तास भारनियमन केले जात आहे.
महावितरणच्या १४ मार्च (शनिवार) रोजीच्या दैनंदिन प्रणाली अहवालानुसार, कंपनीला सकाळी ११ वाजता, दुपारी ४ वाजता आणि पहाटे ४ वाजताची विजेची मागणी पूर्ण करणे शक्य झाले होते. मात्र, रात्री ८ वाजता १००० मेगावॅटपेक्षा अधिक क्षमतेचे भारनियमन करावे लागले.
संध्याकाळी का होतेय लोडशेडिंग?
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, संपूर्ण महाराष्ट्रात तापमान वाढत असल्याने संध्याकाळच्या वेळी विजेची मागणी पूर्ण करणे शक्य होत नाही. रात्रीच्या वेळी सौर ऊर्जा निर्मिती पूर्णपणे थांबते (शून्य) , त्यामुळे महावितरणसमोर अडचणी निर्माण होतात. शिवाय, 'गल्फ वॉर'मुळे वायू-आधारित वीज निर्मितीही पूर्णपणे थांबली आहे. याच कारणामुळे, ज्या गावांमध्ये विजेची गळती जास्त आहे, अशा गावांमध्ये भारनियमन केले जात आहे.
तापमान ४५ अंशांवर काय होणार?
सध्या मार्च महिन्यात बहुतांश ठिकाणी तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर गेलेले नाही. मात्र, जर आताच महावितरणला वीजपुरवठा करणे शक्य होत नसेल, तर राज्यातील मोठ्या भागात जेव्हा तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल, तेव्हा मागणी कशी पूर्ण होणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. यावर अधिकाऱ्यांनी सांगितले की, उन्हाळ्याच्या ऐन भरात भारनियमन टाळण्यासाठी कंपनी उपाययोजनांवर काम करत आहे. तसेच, हे भारनियमन लवकरच संपुष्टात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
वीजेची वाढलेली मागणी आणि निर्मितीतील तुटवडा यामुळे राज्यावर लोडशेडिंगचे संकट घोंघावत असून, येत्या काळात नागरिकांना यासामोरे जावे लागणार आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.