आटपाडी नगरपंचायतीमध्ये १ कोटींच्या निधीतून साकारणार दिमाखदार 'नमो उद्यान'
नगरसेवक पै. अजित जाधव यांची मागणी; प्रभाग १३ मधील जागेचा प्रस्ताव
आटपाडी: राज्य शासनाच्या नगरविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या 'वैशिष्ट्यपूर्ण योजना' अंतर्गत आटपाडी नगरपंचायतीसाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून शहरात 'नमो उद्यान' विकसित करण्यात येणार असून, हे उद्यान प्रभाग क्रमांक १३ मधील नगरपंचायतीच्या मालकीच्या खुल्या जागेत साकारण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक पै. अजित शिवाजी जाधव यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
या संदर्भात पै. अजित जाधव यांनी आटपाडी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांना सविस्तर पत्र दिले आहे. नगरविकास विभागाने १७ सप्टेंबर २०२५ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार (क्रमांक: नपावे-२०२५/प्र.क्र. २२४/नवि-१६), राज्यातील नगरपंचायतींमध्ये पर्यावरणपूरक आणि सुसज्ज उद्याने विकसित करण्यासाठी निधीची तरतूद केली आहे.
प्रभाग १३ मधील जागेचा प्रस्ताव
नगरसेवक जाधव यांनी सुचविल्याप्रमाणे, आटपाडीमधील विठ्ठलनगर (प्रभाग १३) येथील भूमापन क्रमांक व उपविभाग ४१५५/४१५८/५९ मध्ये नगरपंचायतीच्या मालकीची मोकळी जागा उपलब्ध आहे. ही जागा 'नमो उद्यान' प्रकल्पासाठी अत्यंत योग्य असून, यामुळे परिसरातील नागरिकांना मनोरंजनाचे केंद्र उपलब्ध होईल तसेच शहराच्या सौंदर्यातही भर पडेल.
"शासनाने मंजूर केलेला १ कोटींचा निधी आटपाडीच्या वैभवात भर टाकणारा आहे. हे उद्यान प्रभाग १३ मधील नियोजित जागेत झाल्यास सर्वसामान्य नागरिकांना आणि लहान मुलांना त्याचा मोठा फायदा होईल. प्रशासनाने या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करावी हीच विनंती."
— पै. अजित शिवाजी जाधव (नगरसेवक, आटपाडी)
या प्रकल्पामुळे आटपाडी शहरात एक आधुनिक आणि सर्वसोयींनी युक्त असे हरित क्षेत्र निर्माण होणार असून, स्थानिक नागरिकांकडून या निर्णयाचे स्वागत होत आहे.


Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.