⚡ ब्रेकिंग News

वाढदिवशीच दहावीचा विद्यार्थी आश्रमशाळेतून गायब; दोन दिवसांनी झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ

वाढदिवशीच दहावीचा विद्यार्थी आश्रमशाळेतून गायब; दोन दिवसांनी झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ

नाशिकमधील त्र्यंबकेश्वरमध्ये भयानक प्रकार; आई-वडील मोलमजुरी करणारे, गेल्या दोन दिवसांपासून शोध सुरू होता

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातून एक अत्यंत संवेदनशील आणि भयानक घटना समोर आली आहे. पिंप्री येथील माध्यमिक आश्रमशाळेत शिक्षण घेणारा दहावीचा विद्यार्थी वाढदिवशीच कोणालाही न सांगता बेपत्ता झाला होता. दोन दिवसांच्या शोधाशोधीनंतर त्याचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

संजय सदू नडगे (वय १७) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंप्री येथील माध्यमिक आश्रमशाळेत दहावीत शिक्षण घेत होता. गुरुवारी (दि. १२) दुपारी तीनच्या सुमारास तो कोणालाही काहीही न सांगता अचानक आश्रमशाळेतून निघून गेला. बराच वेळ झाला तरी तो परत न आल्याने शाळा प्रशासनाचा संशय वाढला. शुक्रवारी (दि. १३) मुख्याध्यापक सुनील विठ्ठल जाधव यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात विद्यार्थी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

रविवारी (दि. १५) दुपारच्या सुमारास आश्रमशाळेच्या मागील बाजूस सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरावरील झाडीत गुरे चारण्यासाठी गेलेल्या मुलांना एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला. त्यांनी तातडीने आश्रमशाळेत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक बोडके व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. पंचनामा पूर्ण होईपर्यंत सायंकाळ झाली होती. त्यानंतर संजयच्या आई-वडिलांना घटनास्थळी बोलावण्यात आले.

वाढदिवशीच घडली दुर्घटना

विशेष म्हणजे, शाळेच्या नोंदीनुसार संजय नडगे याचा जन्म १२ मार्च २००९ असून, वाढदिवसाच्याच दिवशी तो आश्रमशाळेतून निघून गेल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे त्याने असे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. संजय हा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गुजरात सीमेवर असलेल्या बुरूडपाडा गावातील रहिवासी होता. त्याचे आई-वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. रोजंदारीसाठी स्थलांतर करावे लागत असल्याने संजयला शिक्षणासाठी आश्रमशाळेत ठेवण्यात आले होते. तो काही वर्षांपासून या आश्रमशाळेत निवासी विद्यार्थी म्हणून राहत होता. त्याचे दोन भाऊदेखील याच शाळेत शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

आई-वडीलही शोध घेत होते

संजय बेपत्ता झाल्यापासून त्याचे आई-वडीलही त्याचा शोध घेत होते. आश्रमशाळेच्या मागील डोंगरावरील झाडीत विद्यार्थी अभ्यासासाठी जात असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे. विद्यार्थी शाळेबाहेर गेल्यास त्याची नोंद ठेवणे आवश्यक असते. या प्रकरणात अशी नोंद ठेवली होती की नाही, याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या घटनेमुळे आश्रमशाळेच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संजयच्या मृत्यूमागे नेमके काय कारण आहे, हा आत्महत्येचा प्रकार आहे की अन्य काही घडले आहे, याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, या घटनेने संपूर्ण त्र्यंबकेश्वर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून संजयच्या मृत्यूचे गूढ उलगडण्याची मागणी होत आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...