भारताच्या टी-20 विश्वचषक विजयावर बिग बींची हलकीफुलकी प्रतिक्रिया; चाहत्यांनी केल्या मजेशीर प्रतिक्रिया
मुंबई : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या ICC टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी दणदणीत पराभव करत इतिहास रचला. टीम इंडियाने तिसऱ्यांदा हा विश्वचषक जिंकत देशभरात जल्लोषाचं वातावरण निर्माण केलं. या विजयानंतर क्रिकेटप्रेमींसह अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला. मात्र बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या एका ट्विटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
अमिताभ बच्चन यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, "कहा था नहीं देखूंगा तो जीत जाएंगे! हो गया." म्हणजेच, सामना न पाहिल्यामुळेच भारत जिंकला, असा हलक्याफुलक्या अंदाजात त्यांनी मजेशीर उल्लेख केला. अनेक क्रिकेट चाहत्यांप्रमाणेच भारत जिंकावा म्हणून सामना न पाहण्याची ही कबुली त्यांनी या पोस्टमधून दिली.
या ट्विटनंतर मात्र सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रियांचा पाऊस पाडला. एका यूजरने म्हटलं, "2023 चा वर्ल्ड कप आपण तुमच्यामुळे हरलो का?" तर दुसऱ्याने विनोदी शैलीत लिहिलं, "सर, पुढील १० वर्षे तुम्ही टीव्हीच पाहू नका, आपण सगळे ट्रॉफी जिंकू!" काही चाहत्यांनी त्यांना पनौती असे संबोधित करत, "पुन्हा कधीही क्रिकेट पाहू नका" अशी विनंती केली. अनेकांनी मात्र बच्चन यांच्या भावनेशी सहमत होत आपणही अंधश्रद्धेपोटी सामने पाहत नसल्याचं सांगितलं.
दरम्यान, अमिताभ बच्चन लवकरच 'कल्की २८९८ एडी पार्ट २' मध्ये अश्वत्थाम्याच्या भूमिकेत दिसणार असून 'ब्रह्मास्त्र पार्ट २' मध्येही ते महत्त्वपूर्ण भूमिकेत असल्याचं सांगितलं जात आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या बिग बींचे हे ट्विट सध्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनलं आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.