बारामतीची पोटनिवडणूक आता 'पवार सरकार'ची अग्निपरीक्षा?; अंतिम मतदार यादी जाहीर, सुनेत्रा पवार रिंगणात उतरणार
उपमुख्यमंत्रीपदापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; कलम 164(4) च्या कालमर्यादेमुळे निवडणूक आयोगाची तयारी सुरू
बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक ही राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीची तयारी सुरू केली असून, अंतिम मतदार यादी 10 मार्च 2026 रोजी जाहीर करण्यात आली आहे. आता या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उमेदवार असणार की निवडणूक बिनविरोध होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अंतिम मतदार यादीत वाढ; 3.83 लाखांपार मतदार
बारामती पोटनिवडणुकीसाठी विशेष मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. 9 फेब्रुवारी रोजी प्रारूप यादी प्रसिद्ध झाली होती, त्यानंतर 25 फेब्रुवारीपर्यंत दावे व हरकती घेण्यात आल्या. या प्रक्रियेनंतर 10 मार्च रोजी जाहीर अंतिम मतदार यादीनुसार, बारामतीतील एकूण मतदारसंख्या 3 लाख 83 हजार 767 इतकी झाली आहे. यामध्ये पुरुष मतदार 1 लाख 93 हजार 496, महिला मतदार 1 लाख 90 हजार 271 तर इतर मतदार 24 आहेत.
सुनेत्रा पवार यांच्यासमोर 'कलम 164(4)'चे आव्हान
राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली आहे. मात्र, भारतीय संविधानाच्या कलम 164(4) नुसार, विधिमंडळाचे सदस्य नसलेली व्यक्ती मंत्रीपदावर राहू शकते; परंतु शपथ घेतल्यापासून सलग सहा महिन्यांच्या आत तिला विधानसभा किंवा परिषदेचे सदस्य होणे अनिवार्य आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांना बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून निवडून येणे आवश्यक आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आहे.
'सासन' की 'समर्पण'? बिनविरोध निवडणुकीची शक्यता
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यावर भर देण्यात आला आहे. पवार कुटुंबाचा आणि अजितदादांचा वारसा असलेली ही जागा बिनविरोध मिळावी, यासाठी पक्षस्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, विरोधकांकडून कोणी उमेदवार दिला तर निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे.
सुनेत्रा पवार : सामाजिक कार्यकर्ती ते उपमुख्यमंत्रीपर्यंतचा प्रवास
18 ऑक्टोबर 1963 रोजी तेर (धाराशिव) येथे जन्मलेल्या सुनेत्रा पवार यांचा राजकीय वारसा त्यांना लाभलेला आहे. त्या माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या बहिणी आहेत. 1985 मध्ये अजित पवार यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या बारामतीतील काटेवाडी येथे स्थायिक झाल्या. येथे त्यांनी ग्रामस्वच्छता चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. पहाटे स्वतः हातात खराटा घेऊन सुरू केलेल्या या कामाने काटेवाडीला राज्यात प्रथम क्रमांक मिळवून दिला. या कार्याची दखल घेत त्यांना सार्क देशांच्या साकोसान परिषदेत सहा राष्ट्रप्रमुखांसमोर भाषण करण्याची संधी मिळाली.
सामाजिक कार्यापासून राज्यसभेपर्यंत
'एनव्हायर्नमेंट फोरम ऑफ इंडिया'च्या माध्यमातून त्यांनी मोतीबिंदू शस्त्रक्रिया, वृक्षारोपण, ओढा खोलीकरण आणि महिलांमध्ये कर्करोगजन्य जागृती असे अनेक उपक्रम राबवले. बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून त्यांनी हजारो महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्याविरोधात त्या निवडणूक लढवून पराभूत झाल्या; परंतु खचून न जाता जनसेवा सुरूच ठेवली. त्यानंतर त्यांना राज्यसभेवर पाठविण्यात आले. राज्यसभा खासदार म्हणून काम करताना त्यांना तालिका अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली.
अजित पवार यांना दिलेली साथ
अजित पवार यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत सुनेत्रा पवार यांनी त्यांना साथ दिली. शेतकाम, पोल्ट्री व्यवसाय, गाईगुरे सांभाळण्यापासून ते राजकीय संकटाच्या काळातही त्यांनी दादांना सल्ला आणि आधार दिला. आता अजित पवारांच्या निधनानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला आहे. या पदाची सांगड बारामतीच्या पोटनिवडणुकीशी घालताना सुनेत्रा पवार यांच्यासमोर मोठे आव्हान असून, पवार परिवाराचा वारसा कायम राखण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.