कटकारस्थान, पुरावे नष्ट करणे, बनावट कागदपत्र...अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणी कर्नाटकने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये काय काय?
रोहित पवारांच्या तक्रारीवरून बंगळुरू पोलिसांनी दाखल केली झिरो एफआयआर; अपघात नव्हे तर 'मोठा गुन्हेगारी कट' असल्याचा गंभीर आरोप
बंगळुरू / मुंबई: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी मोठी कायदेशीर हालचाल झाली आहे. बंगळुरू (कर्नाटक) पोलिसांनी या प्रकरणी 'झिरो एफआयआर' दाखल केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामध्ये हा केवळ अपघात नसून एक 'मोठा गुन्हेगारी कट' असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
एफआयआरमध्ये काय आरोप?
कर्नाटकातील बेंगळुरू येथे नोंदवण्यात आलेल्या 'झिरो एफआयआर' मध्ये अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अत्यंत गंभीर आरोप नोंदवण्यात आले आहेत. रोहित पवार यांनी दाखल केलेल्या या तक्रारीत अपघातामागे केवळ तांत्रिक बिघाड नसून मोठ्या प्रमाणावर कटकारस्थान असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
एफआयआरमध्ये भारतीय न्याय संहितेअंतर्गत खालील गंभीर कलमांचा समावेश करण्यात आला आहे:
खून
निष्काळजीपणामुळे मृत्यू
कटकारस्थान (क्रिमिनल कॉन्स्पिरसी)
पुरावे नष्ट करणे
बनावट कागदपत्र तयार करणे
तक्रारीत पुढे असे म्हटले आहे की, विमानाच्या सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले. उड्डाणाच्या वेळी आवश्यक असलेल्या दृश्यता मर्यादेपेक्षा कमी परिस्थितीत लँडिंगला परवानगी देण्यात आली होती. याशिवाय विमानाच्या वापराच्या तासांमध्ये विसंगती असल्याचा आरोप आहे. अधिकृत नोंदी आणि प्रत्यक्ष वापर यात फरक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच, पायलटची शेवटच्या क्षणी केलेली बदल आणि संबंधित पायलटच्या शिस्तभंगाच्या इतिहासाबाबतही शंका व्यक्त करण्यात आली आहे. या सर्व बाबींमुळे अपघात हा केवळ दुर्घटना नसून गंभीर निष्काळजीपणा आणि संभाव्य गैरव्यवहारामुळे घडलेला असल्याचे म्हटले आहे.
'झिरो एफआयआर' म्हणजे काय?
जेव्हा एखादी तक्रार घटनास्थळाच्या हद्दीत नसलेल्या पोलीस ठाण्यात नोंदवली जाते, तेव्हा त्याला 'झिरो एफआयआर' म्हणतात. यावर '०' क्रमांक देण्यात येतो, कारण त्याचा अनुक्रमांक नंतर मूळ पोलीस ठाण्यात निश्चित केला जातो. झिरो एफआयआरच्या माध्यमातून गुन्हा कोणत्याही पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेला असला, तरी तो कोणत्याही पोलीस ठाण्यात नोंदवला जाऊ शकतो. हे एक महत्त्वपूर्ण कायदेशीर साधन आहे, जे तातडीने तपासाला सुरुवात करण्यासाठी आणि पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरते. घटनास्थळाच्या हद्दीचा वाद न घालता तक्रार स्वीकारण्याची परवानगी झिरो एफआयआरद्वारे मिळते, ज्याची नंतर मूळ पोलीस ठाण्याकडे बदली केली जाते.
महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग
अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत महाराष्ट्रात एफआयआर दाखल होऊन त्यांना न्याय मिळू शकला नसल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. २३ मार्चला कर्नाटकमधील पोलीस ठाण्यात झिरो एफआयआर दाखल करून तो महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. याबाबत कर्नाटक पोलिसांचे आभार मानताना रोहित पवार म्हणाले, "आता महाराष्ट्र पोलिसांची जबाबदारी वाढली असून या एफआयआरचा तपास कशा पद्धतीने होतो, याकडे आम्ही बारकाईने लक्ष ठेवू."
ही झिरो एफआयआर आता तपासासाठी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली आहे. या प्रकरणातील पुढील तपास आणि त्यावरून होणारे राजकीय परिणाम याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.