कमर्शियल गॅसचा पुरवठा खोळंबल्याने मेनूमध्ये कपात, कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर संकट; काळाबाजाराचा आरोप, प्रशासनावर कारवाईची मागणी
भिवंडी: आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तणावाचा परिणाम आता स्थानिक पातळीवरही दिसू लागला आहे. कमर्शियल गॅसचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने भिवंडी शहरासह परिसरातील अनेक ढाबे आणि हॉटेल व्यवसाय अडचणीत सापडले आहेत. गॅसअभावी काही ठिकाणी पारंपरिक चुली आणि शेगड्यांचा वापर करून व्यवसाय सुरू ठेवण्याची वेळ आली आहे.
चुली पेटवून व्यवसाय सुरू
मुंबई-नाशिक महामार्ग, चाविंद्रा मार्ग आणि वाडा मार्गावरील शेकडो ढाबे आणि हॉटेल्सवर कमर्शियल गॅसच्या तुटवड्याचा मोठा फटका बसला आहे. वेळेवर गॅस उपलब्ध न झाल्याने व्यावसायिकांनी पर्याय म्हणून चूल आणि शेगडीचा वापर सुरू केला आहे. यामुळे स्वयंपाकाची प्रक्रिया मंदावली असून ग्राहकांनाही प्रतिक्षा करावी लागत आहे.
मेनूमध्ये मोठी कपात
गॅसच्या तुटवड्याचा थेट परिणाम हॉटेलच्या मेनूवर झाला आहे. पूर्वी ५०० पेक्षा जास्त प्रकारचे पदार्थ देणाऱ्या काही हॉटेलमध्ये आता केवळ ५ ते ६ मर्यादित पदार्थच तयार केले जात आहेत. यामुळे ग्राहकांची संख्या कमी झाली असून व्यवसायाला मोठा फटका बसला आहे.
व्यवसायिक आणि कर्मचाऱ्यांवर संकट
गॅस तुटवड्यामुळे ढाबा आणि हॉटेल व्यवसायिकांना प्रचंड आर्थिक फटका बसत आहे. पूर्वी ग्राहकांच्या गर्दीने गजबजलेले ढाबे आता ओस पडल्याचे चित्र आहे. याचा परिणाम येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या उदरनिर्वाहावरही झाला असून अनेकांच्या नोकऱ्याच धोक्यात आल्या आहेत.
काळाबाजाराचा आरोप
दरम्यान, कमर्शियल गॅसचा तुटवडा असताना काही ठिकाणी गॅस सिलेंडरचा काळाबाजार होत असल्याचा आरोप ढाबा व्यवसायिकांनी केला आहे. बाजारभावापेक्षा जास्त दराने गॅस विक्री होत असल्याचेही सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर व्यवसायिकांनी प्रशासनाकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. कमर्शियल गॅसचा पुरवठा सुरळीत करावा, तसेच काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी भिवंडीतील ढाबा आणि हॉटेल व्यवसायिकांनी सरकारकडे केली आहे.
पुण्यातही गॅस तुटवडा
पुणे शहरातही एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बुकिंग करूनही वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संताप वाढत आहे. मार्केट यार्ड परिसरातील गॅस गोडाऊनबाहेर सिलेंडरसाठी नागरिकांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. अनेकांना चार-पाच दिवस प्रतिक्षा करूनही गॅस मिळत नसल्याने गॅस एजन्सी कार्यालयात वादावादीचे प्रकार घडत आहेत.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.