‘टूथपिक उचलणेही अशक्य; हा फोटो ह्रतिकनेच क्लिक केला’ – सबाने सोशल मीडियावर शेअर केला हॉस्पिटलमधील फोटो
मुंबई : बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशनची गर्लफ्रेंड, अभिनेत्री-गायिका सबा आझाद सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. तिला पोटाच्या गंभीर इन्फेक्शनचा त्रास झाला असून गेल्या १४ दिवसांपासून ती आजारी आहे. सबाने सोशल मीडियावर हॉस्पिटलमधील आपला फोटो शेअर करत प्रकृतीची माहिती दिली असून या कठीण काळात ह्रतिक रोशन तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे दिसून आले आहे.
सबा आझादने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती हॉस्पिटलच्या बेडवर आराम करताना दिसत आहे. या फोटोसह तिने एक भावनिक कॅप्शन लिहिले आहे. ‘माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस. सायक्लोस्पोरा कॅटेनेन्सिस – हे किती भयंकर आहे. मी नेहमी घरचे जेवण खाते, कोमट पाणी पिते. तरीही मला पोटाच्या इन्फेक्शनचा त्रास झाला,’ असे सबाने म्हटले आहे.
अभिनेत्रीने पुढे लिहिले की, ‘माझे आधीच वजन कमी होते. त्यात दोन आठवड्यांत माझे ४ किलो वजन कमी झाले. मी आता व्यवस्थित चालूही शकत नाही. जर दिवसभरात कधी व्यायाम केला, तर दुसऱ्या दिवशी माझे वजन अर्धा किलोने कमी होते. वेट लिफ्टिंग तर दूरच, टूथपिक उचलणेही अशक्य होत आहे.’
सबाने सर्वांना आवाहन करताना लिहिले की, ‘कृपया, तुमच्या आतड्यांच्या आरोग्यासाठी भाज्या व्यवस्थित धुऊन खा. कारण यावर आपले आयुष्य अवलंबून आहे.’ तिने हा फोटोही ह्रतिक रोशननेच क्लिक केल्याचे स्पष्ट केले आहे. ‘हा फोटो ह्रतिकनेच क्लिक केला आहे. त्यांनी माझ्या चिडचिडेपणाला कायम हसत खेळत करण्याचा प्रयत्न केला. टीप – मी इथे दिसते तितकी लहान नाही. बेड खूप मोठा आहे. तसेच अँगलही मोठा आहे,’ अशी विनोदी शैलीत नोंदही तिने केली आहे.
सबाची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून चाहत्यांनी तिला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या कठीण प्रवासात ह्रतिक रोशन तिच्या पाठीशी ठामपणे उभा असून त्यानेही अनेकदा तिची काळजी घेतल्याचे सबाने यापूर्वीच्या पोस्टमधून सांगितले आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.