‘रिपोर्ट पाहून एकटीच खचले, वेदना असह्य होत्या; मित्रांची साथ लाभली’ – अभिनेत्रीने सोशल मीडियातून व्यक्त केल्या भावना
मुंबई : ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसिरीजमधून प्रकाशझोटात आलेली अभिनेत्री राजश्री देशपांडे कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी झुंज देत आहे. तिला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. अभिनेत्रीने सोशल मीडियात रुग्णालयातील फोटो शेअर करत आपली आपबिती सांगितली असून तिच्या या पोस्टने नेटकऱ्यांना भावुक केले आहे.
राजश्री देशपांडेने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने लिहिले आहे की, ‘जेव्हा मला ब्रेस्ट कॅन्सरबद्दल समजले, तेव्हा रुग्णालयातील रिपोर्ट सेंटरबाहेर मी एकटीच होते. रिपोर्ट पाहून मी पूर्णपणे खचून गेले. मला स्वतःला सावरता आले नाही. अनेकांनी विचारले, ‘तू इतकी फिट आहेस, मग कसा हा आजार तुला झाला?’ पण खरे सांगायचे तर माझ्याकडे याचे उत्तर नाही.’
अभिनेत्रीने पुढे लिहिले की, ‘हा आजार केवळ शारीरिक नव्हता, तर मानसिक आणि भावनिकही होता. मी बऱ्याचदा रडले, कारण या वेदना असह्य होत्या. मला प्रचंड त्रास झाला. या काळात मला मित्रांची विशेष साथ लाभली. कधी मी हार मानणार नाही असे ठरवते, तर कधी असेही दिवस येतात की मला काहीच नकोसे वाटते. शांत राहावेसे वाटते किंवा मेरी ऑलिव्हरच्या कवितेसारखे खिडकीवर चिमणीसोबत सूर्योदय पाहावासा वाटतो.’
‘सकाळी आनंदाने उठणे याला खरोखरच आपण ‘अचिव्हमेंट’ (Achievement) म्हणू शकतो का? आज मी स्वतःसाठी हसले आणि स्वतःला मिठी मारली. ज्यांनी मला या प्रवासात फोन केला, मेसेज केला, माझी विचारपूस केली आणि प्रेम दिले, त्यांचे मनापासून आभार,’ असे राजश्रीने म्हटले आहे.
पोस्टच्या शेवटी ती म्हणाली, ‘मला माहिती नाही, पण पुन्हा एकदा नव्याने संघर्षासाठी तयार राहावे लागेल.’ अभिनेत्रीच्या या भावनिक पोस्टनंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर तिला धीर देणारे संदेश लिहिण्यास सुरुवात केली आहे. अनेक नेटकऱ्यांनी तिच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.