महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरेंनी दिली खुशखबर; पुढील २-३ दिवसांत आधार लिंक्ड खात्यात रक्कम जमा, ई-केवायसी दुरुस्तीसाठी ३१ मार्चपर्यंत मुदत
मुंबई: महाराष्ट्रातील कोट्यवधी लाडक्या बहिणींसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया आजपासून अधिकृतपणे सुरू झाली आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत माहिती देताना पुढील ४८ ते ७२ तासांत पात्र महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यात १५०० रुपये जमा होणार असल्याचे सांगितले आहे.
मंत्री अदिती तटकरे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : फेब्रुवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. पुढील २-३ दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे.”
महायुती सरकारच्या या लोकप्रिय योजनेद्वारे राज्यातील पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबातील २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ मिळतो. फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो महिलांना आता मोठा दिलासा मिळाला आहे.
ई-केवायसी दुरुस्तीसाठी शेवटची संधी
योजनेच्या अटींनुसार, ज्या महिलांनी ई-केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडले होते, त्यांना दुरुस्ती करण्यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. सध्या महिलांकडे फक्त ६ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. ज्यांचे बँक खाते आधारशी लिंक आहे आणि ई-केवायसी पूर्ण आहे, अशा महिलांना प्राधान्याने हा लाभ मिळेल.
मंत्री अदिती तटकरे यांनी योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाचे कौतुक केले. तसेच महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या विश्वासामुळे योजनेची वाटचाल यापुढेही दमदारपणे सुरू राहील, असा विश्वास व्यक्त केला.
पात्र लाभार्थींनी आपले बँक खाते, आधार लिंकिंग आणि ई-केवायसीची स्थिती तपासून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट किंवा महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.