पेट्रोल अफवांवर कारवाई सुरू, रुपाली चाकणकर समन्स प्रकरणी माहिती नसल्याचे स्पष्टीकरण; आसाम-केरळमध्ये जाणार प्रचारासाठी
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये ६९ व्या ऑल इंडिया पोलीस ड्युटी मीटचे उद्घाटन केल्यानंतर विविध मुद्द्यांवर भाष्य केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चा, पेट्रोल साठ्यावरील अफवा, अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना मिळालेले समन्स यासह अनेक विषयांवर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर फडणवीस म्हणाले, “मला असे वाटते की कुठली ती स्टेज नाही की मी कमेंट करावी. त्यांचे आपापसात कोणी बोलले असेल तर… शेवटी कसे आहे की समजा सुनेत्राताई पवारांचे काय मत असेल, वरिष्ठ नेत्यांचे काय मत असेल तर ते आमच्याशी चर्चा करतील. प्रत्येक गोष्टीवर आम्ही प्रतिक्रिया दिली पाहिजे असे काही त्याचे कारण नाही.”
पेट्रोल अफवांवर कारवाई सुरू
पेट्रोल पंपावरील स्थिती सामान्य असल्याचे सांगत फडणवीस म्हणाले, “जेव्हा लोकांनी रांगा लावल्या होत्या तेव्हा आम्ही सांगत होतो, रांगा लावू नका. तरीही काही लोक अफवा पसरवत होते. आता अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे, त्यामुळे रांगा लागणार नाहीत. कोणीही अफवा पसरवू नये.”
रुपाली चाकणकर समन्स प्रकरणी काय म्हणाले?
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना समन्स देण्यात आल्याबाबत फडणवीस म्हणाले, “या प्रकरणाची सध्याची स्थिती काय आहे, हे मला माहीत नाही. जी काही चौकशी सुरू आहे, ती निष्पक्षपणे सुरू आहे. दररोज अशा प्रकरणांची माहिती दिली जात नाही; आवश्यकता असल्यासच आम्ही माहिती घेतो. या प्रकरणाची चौकशी सुरू असून, योग्य वेळी त्याबाबतची माहिती दिली जाईल.”
प्रचारासाठी आसाम-केरळमध्ये जाणार
पाच राज्यांमध्ये निवडणुका होत असल्याबाबत ते म्हणाले, “पक्ष जिथे मला पाठवेल, तिथे मी जाईन. आसाम आणि केरळ या दोन राज्यांमध्ये मी निवडणूक प्रचारासाठी जाणार आहे.”
पोलीस दलाचे कौतुक
६९ व्या ऑल इंडिया पोलीस ड्युटी मीटचे यजमानपद नागपूरला मिळाल्याबद्दल फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “१९५९ मध्ये ही ड्युटी मीट सुरू झाली तेव्हा ती पहिल्यांदा नागपूरमध्येच आयोजित करण्यात आली होती. या ड्युटी मीटमध्ये सायबर आणि कॉम्प्युटर अवेअरनेस, पोलीस डॉग कॉम्पिटिशन, व्हिडिओग्राफी या विषयांवर चर्चा आणि स्पर्धा होणार आहेत.”
महाराष्ट्र पोलीस दलाचे कौतुक करताना ते म्हणाले, “आपले पोलीस फोर्स चांगले काम करत आहे. फॉरेन्सिक असिस्टंटमुळे गुन्हेगारांना शिक्षा देण्यात येत आहे. महाराष्ट्र पोलीस दल हे देशातील एक मोठे दल म्हणून पाहिले जाते. नव्या तंत्रज्ञानातही महाराष्ट्र चांगले काम करत आहे. सर्वात चांगली सायबर लॅब महाराष्ट्रात तयार करण्यात आली आहे.”
फडणवीस यांच्या या भूमिकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबतच्या चर्चांना नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. तसेच, पेट्रोल अफवांवर कारवाई करतानाच नागरिकांनी घाबरून साठेबाजी करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.