चारित्र्याच्या संशयातून निर्घृण हत्या; दगडाने तोंड ठेचून ओळख पुसली, पतीसह साथीदाराला पोलिसांनी केले अटक
विरार : चारित्र्याच्या संशयातून पतीने आपल्या पत्नीची अत्यंत निर्घृण हत्या करून तिची ओळख पुसण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना विरारमध्ये उघडकीस आली आहे. वज्रेश्वरी जवळील शिरवली गावच्या शिवारात एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्यानंतर विरार गुन्हे शाखा कक्ष-३ ने तपास करत पती आणि त्याच्या साथीदाराला अटक केली.
शिवारात आढळला कुजलेला मृतदेह
२१ मार्च रोजी शिरवली गावाजवळील एका निर्जन शेतात २५ ते ३० वयोगटातील एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने तिची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. गुन्हे शाखेने तातडीने तपासाची चक्रे फिरवली आणि परिसरातील शेकडो सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.
तांत्रिक तपासात सापडला खुनींचा माग
तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी रोशन यादव (२६) आणि त्याचा मित्र भानुप्रताप यादव (३०) यांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला. मृत महिलेचे नाव मधुबाला उर्फ प्रियाकुमारी यादव (२२) असून ती मुख्य आरोपी रोशन यादव याची पत्नी होती.
दगडाने तोंड ठेचून ओळख पुसली
रोशनला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता, ज्यातून त्यांच्यात सतत वाद होत असत. १९ मार्च रोजी रोशनने आपला मित्र भानुप्रताप याच्या मदतीने मधुबालाला फिरवण्याच्या बहाण्याने वज्रेश्वरी येथील दुर्गम भागात नेले. त्यानंतर दोघांनी मिळून मधुबालावर धारदार शस्त्राने वार केले. ओळख पटू नये म्हणून दगडाने तोंड ठेचून तिची हत्या केली व मृतदेह तिथेच टाकून पसार झाले.
कठोर शिक्षेची मागणी
वज्रेश्वरी सारख्या दुर्गम भागात पुरावे नसताना केवळ सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाच्या जोरावर विरार गुन्हे शाखा कक्ष-३ ने हा गुन्हा उघडकीस आणला. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.