मुंबई तापणार! तीन जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट; पारा ४० अंशांच्या पार
मुंबईत सरासरीपेक्षा ६.४ अंशांनी वाढलेल्या तापमानाचा अंदाज; राज्यभर उन्हाच्या झळा, हवामान विभागाचा सावधानतेचा इशारा
मुंबई: राज्यात उन्हाचा कडाका वाढत असून आज मुंबई, पालघर आणि ठाणे जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत आज कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून उपनगरातील काही भागांमध्ये तापमान ४३ अंशांपर्यंत जाऊ शकते. काल राम मंदिर परिसरात तब्बल ४२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत सरासरी तापमानापेक्षा ६.४ अंश सेल्सिअस अधिक तापमान नोंदवले जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन मुंबई हवामान केंद्राकडून करण्यात आले आहे.
कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट?
ऑरेंज अलर्ट: मुंबई, पालघर, ठाणे - या ठिकाणी तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा
यलो अलर्ट: रायगड आणि विदर्भातील अकोला जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट
उद्याही पालघर, ठाणे आणि मुंबईत उष्ण व आर्द्र हवामानाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील पाच दिवस संपूर्ण महाराष्ट्रासाठी हवामान विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे. विदर्भात आणि मराठवाड्यात शुष्क वाऱ्यांमुळे तापमानाची धग अधिक जाणवत आहे.
राज्यभरातील तापमानाचा पारा
आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३७.६, बीडमध्ये ३८.३, जळगावात ३९.६, धाराशिवमध्ये ३८, उदगीरमध्ये ३६.६ तर सोलापूरमध्ये ३९.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुंबई-कुलाबा येथे ३५.९ तर सांताक्रुजमध्ये ३८.४ अंश सेल्सिअस तापमान होते. रत्नागिरीमध्ये ३४.६, सांगलीत ३८.२ तर साताऱ्यात ३७.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.
हवामान खात्याने १० आणि ११ मार्च रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी उष्ण आणि आर्द्र हवामान राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. किनारपट्टी भागातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून उन्हाच्या झळांमुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.