एकमेकांवर झालेल्या आरोप-प्रत्यारोपानंतर पहिल्यांदाच सामंजस्याचा सूर; सोशल मीडियावरही ट्रोलर्सची प्रतिक्रिया, राजकीय वर्तुळात विविध अर्थ
मुंबई : शिवसेना फुटीनंतर ज्या मोहित कंबोज आणि ठाकरे गटात राजकीय वैर पाहायला मिळाले होते, त्या वैराला आता पूर्णविराम लागला का? असा सवाल उपस्थित झाला आहे. मोहित कंबोज यांनी आपल्या लेकीच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीत आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
वाढदिवसाच्या पार्टीत बड्या हस्तींची उपस्थिती
शनिवारी मोहित कंबोज यांनी आपल्या लेकीच्या वाढदिवसानिमित्त पार्टीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मंत्री आशिष शेलार, अमित साटम, खासदार सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदे यांच्यासह रितेश देशमुख, संजय दत्त, शाहरुख खान, अनंत अंबानी यांसारखे सेलिब्रिटीही या कार्यक्रमाला उपस्थित होते. मात्र, या सर्व उपस्थितीत सर्वाधिक चर्चा झाली ती आदित्य ठाकरे यांच्या हजेरीची.
ठाकरे-कंबोज वैराचा इतिहास
महाविकास आघाडीचे सरकार असताना मोहित कंबोज यांनी ठाकरे गटावर अनेक आरोप केले होते. शिवसेना फुटीनंतरही एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप आणि मातोश्रीबाहेर झालेला राडा यामुळे दोन्ही गटांमध्ये तणाव होता. शिवसेना पक्षकोटीच्या वेळी मोहित कंबोज शिंदे गटासोबत दिसले होते. अशा पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी मोहित कंबोज यांच्या निवासस्थानी हजेरी लावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
राजकीय वैर संपलं का? विविध अर्थ
आदित्य ठाकरे यांच्या या उपस्थितीवरून विविध अर्थ काढले जात आहेत. काहींच्या मते, ठाकरे-कंबोज यांच्यातील राजकीय वैर संपले आहे. तर काहीजण शिंदे शिवसेना आणि भाजपमधील नाराजीच्या चर्चेदरम्यान ठाकरे गट भाजप नेत्यांशी जवळीक साधत असल्याचे संकेत यातून मिळत असल्याचे मत व्यक्त करत आहेत.
‘वैयक्तिक भेट, राजकारण आणू नका’
ठाकरे गटाकडून ही राजकीय भेट नसून वैयक्तिक भेट असल्याचे सांगण्यात येत आहे. या भेटीत राजकारण शोधू नये, अशी भूमिका मांडली जात आहे. मात्र, कार्यकर्त्यांमध्ये अजूनही मोहित कंबोज विरुद्ध ठाकरे गटाचा संघर्ष विसरला गेलेला नाही. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी लावलेल्या हजेरीमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
सोशल मीडियावर ट्रोल
आदित्य ठाकरे यांच्या या उपस्थितीवर सोशल मीडियावरही ट्रोलर्सनी प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी या भेटीचे विविध अर्थ लावत व्यंग्यात्मक पोस्ट केल्या आहेत. दरम्यान, या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले असून, याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कोणी कोणाचा कायमचा मित्रही नसतो, याची प्रचिती या घटनेनंतर पुन्हा एकदा आली आहे. पुढील काळात ठाकरे गट आणि भाजप यांच्यातील समीकरणे कशी राहतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.