"जीव दे नाहीतर नोकरी घालवू"... प्रेयसीच्या आई-वडिलांच्या छळाला कंटाळून पोलीस शिपायाने प्रशिक्षण केंद्रातच संपवले आयुष्य
नांदेडच्या दिव्याशी प्रेमप्रकरण, मुलीच्या कुटुंबीयांकडून सततचा मानसिक त्रास; सुसाईड नोटमध्ये मांडला संपूर्ण प्रकार, वाकोला पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला
मुंबई पोलीस दलात नुकतीच भरती झालेल्या एका ३२ वर्षीय पोलीस शिपायाने प्रेयसीच्या कुटुंबीयांच्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. "आत्महत्या कर, नाहीतर तुझी नोकरी घालवू," अशी धमकी प्रेयसीच्या आईने दिल्यामुळे या तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याचे त्याच्या सुसाईड नोटवरून स्पष्ट झाले आहे.
नेमकं काय घडलं?
भैयासाभ भीमराव व्हावळे (वय ३२) असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांची मुंबई पोलीस दलात चालक पदावर नियुक्ती झाली होती. ते कलिना येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्राथमिक प्रशिक्षण घेत होते. मात्र, १५ मार्च रोजी सकाळी त्यांनी प्रशिक्षण केंद्रातच गळफास घेऊन आत्महत्या केली.
भैयासाभ यांच्या खिशातून सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासा झाला आहे. नांदेड जिल्ह्यातील हादगाव येथील दिव्या नावाच्या तरुणीशी त्यांचे प्रेमसंबंध होते. मात्र, मुलीच्या आई-वडिलांना हे नाते मान्य नव्हते. चिठ्ठीत भैयासाभ यांनी म्हटले आहे की, प्रेयसीच्या वडिलांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती, तर आईने "आत्महत्या कर, नाहीतर तुझी नोकरी घालवू" असे सांगत सतत मानसिक त्रास दिला. या जाचाला कंटाळूनच त्यांनी हे पाऊल उचलल्याचे नमूद केले आहे.
गुन्हा दाखल; तपास सुरू
भैयासाभ यांचे वडील भीमराव व्हावळे यांच्या तक्रारीवरून वाकोला पोलिसांनी प्रेयसीच्या आई-वडिलांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सुसाईड नोट फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे. सदर नोट भैयासाभ यांच्याच हस्ताक्षरातील असल्याचे वडिलांनी सांगितले असून, फॉरेन्सिक अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
पोलीस दलात खळबळ
नुकतीच पोलीस दलात कारकीर्द सुरू करणाऱ्या एका तरुणाने अशा प्रकारे आपले आयुष्य संपवल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाईची मागणी होत आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.