सायकलवरून जाताना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अडवून चेहऱ्यावर फेकले आम्ल; मुलीचा उजवा डोळा गंभीर जखमी, आरोपी फरार; ग्रामस्थांचा रास्ता रोको आंदोलनाचा इशारा
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात एका 12 वर्षीय चिमुरडीवर झालेल्या अॅसिड हल्ल्याने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. वडगाव पान येथील सहावीत शिकणारी ही विद्यार्थिनी शाळा सुटल्यानंतर सायकलवरून घरी परतत असताना एका अज्ञात विकृताने तिला रस्त्यात अडवून थेट चेहऱ्यावर अॅसिड फेकले. या क्रूर हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.
मुलीची पहिली प्रतिक्रिया काय?
उपचारासाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या या मुलीने पोलिसांशी बोलताना सांगितले की, हल्ला करणारा तरुण तिला पूर्णपणे अनोळखी होता. तिने सांगितले की, "एक अज्ञात माणूस रस्त्यात उभा होता. त्याने मला पत्ता विचारला. एवढ्यात त्याने माझ्यावर काहीतरी फेकले आणि मला जोरदार जळजळ सुरू झाली." मुलीने आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन तिला तातडीने डॉक्टर जांभूळकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पुढील उपचारासाठी तिला लोणी येथे हलविण्यात आले आहे.
किती गंभीर आहे मुलीची प्रकृती?
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचा उजव्या बाजूचा डोळा आणि त्याखालील भाग मोठ्या प्रमाणात भाजला आहे. तिच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूचा सुमारे 7 टक्के भाग भाजला असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
पोलिसांची कारवाई आणि शोधमोहीम
घटनेची माहिती मिळताच संगमनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली विविध पथके स्थापन करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, संशयिताचा कसून शोध घेतला जात आहे. मुलीच्या शाळेतही चौकशीसाठी पोलिसांची टीम रवाना झाली आहे.
ग्रामस्थांचा रास्ता रोको आंदोलनाचा इशारा
दरम्यान, या घटनेनंतर वडगाव पान येथील ग्रामस्थांमध्ये मोठा संताप आहे. ग्रामस्थांनी आज रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. विविध राजकीय पक्ष आणि स्थानिक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला असून, आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या घटनेने संपूर्ण राज्य हादरले असून, आरोपीवर कडक कारवाईची मागणी होत आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.