बारामती पोटनिवडणुकीबाबत मतदारांचा मोठा दावा; म्हणाले, "बिनविरोध निवडणूक होणार, सुनेत्राच जिंकणार"
शरद पवार गटाचा निवडणूक न लढण्याचा निर्णय; 23 एप्रिलला मतदान, 4 मे रोजी निकाल
बारामती : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून 4 मे रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. मात्र, या निवडणुकीबाबत बारामतीकरांनी एक मोठा दावा केला आहे.
एबीपी माझाने बारामतीकरांशी संवाद साधून या पोटनिवडणुकीबाबत त्यांची मते जाणून घेतली. बहुतांश नागरिकांच्या मते ही निवडणूक बिनविरोध होईल. एका बारामतीकराने स्पष्टच सांगितले, "हो, बिनविरोध निवडणूक होईल आणि सुनेत्रा पवार जिंकतील." तर दुसऱ्या मतदाराने म्हटले, "निवडणूक बिनविरोध होईल, अशी एकंदरीत हवा आहे. अजितदादांबद्दल सहानुभूती आहे. समोरून कोणी उमेदवार दिले तरीही एकतर्फी निवडणूक होईल."
काहींनी सुनेत्रा पवार यांच्यासमोर कोणीही उमेदवार देणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. तर काही मतदारांनी निवडणूक बिनविरोध न होण्याची शक्यताही वर्तवली आहे. त्यामुळे आगामी काळात बारामतीचे राजकीय समीकरण काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शरद पवार गटाची भूमिकी स्पष्ट: निवडणूक न लढणार
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष बारामती विधानसभा पोटनिवडणूक लढवणार नसल्याची माहिती समोर आली आहे. पक्षांतर्गत बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मागील विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्याविरोधात युगेंद्र पवार यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, आता अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर उमेदवार न देण्याची भूमिका शरद पवार गटाने घेतली आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनेत्रा पवार या उमेदवार असणार आहेत.
अजित पवारांच्या निधनामुळे हळहळ
28 जानेवारी रोजी अजित पवार हे खाजगी विमानाने मुंबईहून बारामतीकडे जात असताना बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान विमान अपघात झाला. या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. त्यांच्या अकाली निधनामुळे राज्यभर दुःखाची लाट उसळली होती. 29 जानेवारी रोजी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यसंस्कार पार पडले.
बारामती विधानसभा पोटनिवडणूक कार्यक्रम:
निवडणुकीची अधिसूचना जारी : 30 मार्च 2026
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत : 6 एप्रिल 2026
अर्जांची छाननी : 7 एप्रिल 2026
अर्ज मागे घेण्याची मुदत : 9 एप्रिल 2026
मतदानाची तारीख : 23 एप्रिल 2026
मतमोजणी : 4 मे 2026
निवडणूक प्रक्रिया पूर्ण : 6 मे 2026
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.