'ऑपरेशन' करायला आलेले निर्वस्त्र होऊन परत गेले; विरोधी आमदारांचा निधी रोखल्याप्रकरणी फडणवीस सरकारवर निशाणा; अहिल्यानगर ॲसिड प्रकरणावरुन गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि राज्यातील महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाला भाजपचे 'अंगवस्त्र' असल्याची टीका करतानाच, दिल्लीतून 'ऑपरेशन' करायला येणाऱ्यांचा इतिहास बोलका असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
'ऑपरेशन' करणारे निर्वस्त्र परतले?
संजय राऊत म्हणाले, "दिल्लीला पानिपतापासून आणि मोगल काळापासून फार मोठा इतिहास आहे. इथे जे जे लोक अशा प्रकारचं 'ऑपरेशन' करायला आले, ते निर्वस्त्र होऊन आपापल्या राज्यात परत गेले." सत्ताधाऱ्यांच्याच गटात अंतर्गत 'ऑपरेशन' सुरू असून त्याची सूत्रे दिल्लीतून हलत असल्याचा दावा त्यांनी केला.
शिंदे-अजित गट भाजपचे अंगवस्त्र
"शिंदे आणि अजित पवार गट हे भारतीय जनता पक्षाचे 'अंगवस्त्र' आहेत. हे पक्ष अमित शहांनी स्थापन केले आहेत. अजित पवारांचा पक्ष शरद पवारांनी स्थापन केलेला नाही किंवा एकनाथ शिंदे यांचा गट बाळासाहेबांचा नाही. त्यांचे मार्गदर्शक नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत, तर आमचे मार्गदर्शक बाळासाहेब आणि प्रबोधनकार ठाकरे आहेत," अशी टीका राऊत यांनी केली.
विरोधी पक्षनेत्यांची 'कोंडी'
विरोधी पक्षाच्या आमदार-खासदारांना निधी न दिल्याप्रकरणी राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला. "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर दोन उपमुख्यमंत्र्यांच्या स्पष्ट सूचना आहेत की विरोधी पक्षाच्या आमदारांची कोणतीही कामे करायची नाहीत, त्यांना एक रुपयाही निधी द्यायचा नाही. जणू यांच्या बापाचा पैसा आहे. धुणी भांडी करून यांच्या बापजाद्यांनी पैसा गोळा केलाय? तिजोरीमध्ये जनतेचा पैसा आहे," असा सवाल त्यांनी केला.
भाजपवर भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालण्याचा आरोप
"भाजप केवळ पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावर क्रॉस व्होटिंग घडवून आणत आहे. ओडिशामध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने 'कोल स्कॅम' प्रकरणी शिक्षा झालेल्या दिलीप रे यांना निवडून आणले. ज्यांच्यावर खून, दरोडे, बलात्काराचे आरोप आहेत, अशा लोकांनाच भारतीय जनता पक्ष आपल्या गळाला लावू शकते," असे राऊत म्हणाले.
फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी
अहिल्यानगरमध्ये एका मुलीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याप्रकरणी राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. "ज्या मुलीवर ॲसिड फेकले ती मुलगी नसून निर्जीव बाहुली होती, अशी उत्तरे तुम्हाला विधानसभेत मिळू शकतात. फडणवीस गृहमंत्री म्हणून अपयशी ठरले असून, त्यांचा अर्धा वेळ दिल्लीत जातो. तुम्हाला थोडा जरी तुमचा आत्मा जिवंत असेल तर तुम्ही गृहखात्याचा त्याग केला पाहिजे," असा टोला त्यांनी लगावला.
प्रसाद लाड यांच्या मुलाच्या लग्नाबाबत भूमिका
प्रसाद लाड यांच्या मुलाच्या लग्नाला उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या उपस्थितीबाबत बोलताना राऊत म्हणाले, "हेच प्रसाद लाड ज्यांनी शिवसेना भवन जाळून टाकू अशी भाषा केली होती. माझ्यासारखा शिवसैनिक हे विसरू शकत नाही. मात्र महाराष्ट्राची संस्कृती आहे की अशा शुभ प्रसंगी राजकारण आणायचं नसतं, म्हणून उद्धव ठाकरे गेले असतील."
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.