मुंबई : जागतिक पातळीवरील वाढत्या तणाव आणि आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. शुक्रवारी झालेल्या व्यवहारात सेन्सेक्स तब्बल १७०० अंकांनी खाली आला, तर निफ्टी २२,८५० च्या खाली घसरला. या एका दिवसाच्या व्यवहारातच गुंतवणूकदारांची सुमारे ९ लाख कोटी रुपयांची संपत्ती पाण्यात गेल्याचे समोर आले आहे.
बाजारातील या अचानक झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, इंडिगो यांसारख्या दिग्गज कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी पडझड झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये एकट्याने ४ टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवली गेली. सरकारकडून विंडफॉल टॅक्स पुन्हा लागू करण्याच्या निर्णयामुळे गुंतवणूकदारांमध्ये नकारात्मक भावना निर्माण झाल्याचे बाजारातील जाणकारांनी स्पष्ट केले.
बाजार घसरणीमागची कारणे काय?
शेअर बाजारातील या मोठ्या घसरणीमागे अनेक जागतिक आणि स्थानिक कारणांचा परिणाम दिसून आला आहे. अमेरिका-इराण संघर्षामुळे जागतिक बाजारात अनिश्चितता वाढली आहे. यासोबतच कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, रुपयाची घसरण आणि परदेशी गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणावर विक्री यामुळे बाजारावर दबाव निर्माण झाला आहे. सलग काही दिवसांच्या तेजीनंतर अचानक आलेल्या या घसरणीमुळे छोट्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक फटका बसला आहे.
पुढे काय? तज्ज्ञांचे मत
बाजारातील तज्ज्ञांच्या मते, सध्याची परिस्थिती ‘वेट अँड वॉच’ (प्रतीक्षा आणि निरीक्षण) अशी आहे. बाजारात अजूनही चढ-उतार सुरू राहण्याची शक्यता आहे. जागतिक परिस्थिती सुधारल्यास बाजारात स्थिरता येऊ शकते, मात्र जागतिक तणाव वाढल्यास आणखी घसरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.