तांत्रिक चुकांमुळे ज्यांचे लाडकी बहीण योजनेचे हप्ते रखडले आहेत, त्यांच्यासाठी राज्य शासनाने अर्ज दुरुस्ती आणि ई-केवायसीची मुदतवाढ दिली आहे. या मुदतीनंतर कोणतीही संधी मिळणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यातील लाखो महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. तांत्रिक चुकांमुळे ज्या महिलांना योजनेचे हप्ते मिळणे बंद झाले होते, त्यांना अर्ज दुरुस्ती आणि ई-केवायसीसाठी ३१ मार्च २०२६ पर्यंतची शेवटची संधी देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे हप्त्यांपासून वंचित राहिलेल्या हजारो लाभार्थी महिलांना मोठा आधार मिळाला आहे.
नेमकी अडचण काय होती?
योजनेच्या सुरुवातीला अर्ज भरताना झालेल्या घाईगडबडीमुळे अनेक महिलांनी ई-केवायसी प्रक्रियेत चुकीचे पर्याय निवडले होते. विशेषतः 'नाही' ऐवजी 'हो' अशा तांत्रिक निवडीमुळे प्रणालीने अनेक पात्र अर्ज नाकारले होते. या तांत्रिक त्रुटी दूर करून माहिती अद्ययावत करण्यासाठी प्रशासनाने ही अंतिम मुदतवाढ दिली आहे.
कोणाला मिळणार दुरुस्तीची संधी?
खालील प्रकारच्या अडचणी असलेल्या लाभार्थी महिलांना या मुदतीत दुरुस्ती करता येईल:
ज्यांचे अर्ज मंजूर आहेत, पण खात्यात एकही हप्ता जमा झालेला नाही.
ज्यांच्या बँक खात्याच्या माहितीत त्रुटी आहेत.
ज्यांनी अद्याप आधार कार्डचे प्रमाणीकरण (आधार ऑथेंटिकेशन) पूर्ण केलेले नाही.
ज्यांचे बँक खाते डीबीटीसाठी लिंक किंवा सक्रिय नाही.
नाव आणि तांत्रिक विसंगती दूर होणार
अनेक महिलांच्या आधार कार्डवरील नाव आणि बँक पासबुकवरील नाव यात तफावत असल्याने त्यांचे हप्ते रखडले होते. आता ३१ मार्चपर्यंत ही दुरुस्ती केल्यास, रखडलेल्या थकीत हप्त्यांसह पुढील सर्व लाभ महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत.
ही शेवटची संधी!
जिल्हा प्रशासनाकडून सर्व पात्र लाभार्थी महिलांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी दिलेल्या मुदतीत आपली ई-केवायसी प्रक्रिया आणि अर्ज दुरुस्ती पूर्ण करावी. ३१ मार्च २०२६ नंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे तांत्रिक कारणास्तव लाभ बंद झालेल्या महिलांनी तातडीने आपली माहिती अद्ययावत करावी.
फेब्रुवारीचा हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला व बाल विकास विभागाकडून चालवली जाते. या योजनेअंतर्गत दरमहा पात्र महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा केले जातात. जानेवारी महिन्याचा हप्ता २३ फेब्रुवारीला वितरित करण्यात आला होता. आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार, याकडे राज्यातील महिलांचे लक्ष लागले आहे. सामाजिक न्याय विभागाकडून २७७ कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आल्याने येत्या काही दिवसांत फेब्रुवारीच्या हप्त्याची रक्कम लाडक्या बहिणींना मिळू शकते.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.