⚡ ब्रेकिंग News

लेहच्या हिमसंकटातून सुखरूप सुटले, पण राजस्थानमध्ये मृत्यूने गाठले; पिंपरीतील ३ जिवलग मित्रांचा दुर्दैवी अंत

लेहच्या हिमसंकटातून सुखरूप सुटले, पण राजस्थानमध्ये मृत्यूने गाठले; पिंपरीतील ३ जिवलग मित्रांचा दुर्दैवी अंत

लेह-लडाख सहल आठवणीत, परतीच्या प्रवासात कोटा येथे फॉर्च्यूनर कार ३० फूट खाली कोसळली; ५ दिवस बर्फवृष्टीत अडकले होते, बीएसएफच्या मदतीने सुटले मात्र नशिबाने साथ दिली नाही

पिंपरी-चिंचवड: नशिबाचा खेळ अत्यंत विचित्र असतो, याची प्रचीती देणारी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लेह-लडाखच्या सहलीवर गेलेल्या पिंपरी-चिंचवडमधील तीन जिवलग मित्रांचा राजस्थानमध्ये भीषण अपघातात मृत्यू झाला. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी लेहमध्ये बर्फवृष्टीमुळे ते पाच दिवस अडकले होते, मात्र बीएसएफच्या मदतीने ते सुखरूप बाहेर पडले होते. पण घरी परतताना मृत्यूने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.

काय आहे प्रकरण?

कुणाल किरण चोरडिया (वय २५, चिंचवडगाव), मयुरेश पांडुरंग पाडाळे (वय २३, म्हाळुंगे) आणि सिद्धांत रमेश आल्हाट (वय २१, थेरगाव) असे मृत तरुणांची नावे आहेत. हे तिघे २७ फेब्रुवारी रोजी फॉर्च्यूनर कारमधून लेह-लडाख आणि काश्मीरच्या सहलीसाठी निघाले होते. तीन कारचा ताफा असलेला हा ग्रुप पर्यटन पूर्ण करून परतत असताना राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात केथून पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिल्ली-मुंबई महामार्गावर ही दुर्घटना घडली.

कार ३० फूट खाली कोसळली

केथून पोलीस ठाण्याचे अधिकारी मनोज सिंह सिकरवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, कराडिया इंटरचेंज ते बालापुरा इंटरचेंज दरम्यान हा अपघात झाला. ही कार पुलावरून सुमारे ३० फूट खाली कोसळली. अपघात एवढा भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला आणि तिघांचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी (१८ मार्च) सकाळी ही घटना घडली.

लेहमध्ये पाच दिवस अडकले होते

खासदार श्रीरंग बारणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ दिवसांपूर्वी कारगिल येथे हे तरुण पाच दिवस अडकले होते. तीव्र बर्फवृष्टीमुळे सर्व रस्ते बंद झाले होते. त्यावेळी त्यांचा फोन आला होता. 'बीएसएफ'च्या कमांडरशी संवाद साधून या तरुणांना तेथून सुखरूप बाहेर काढण्यात आले होते. निसर्गाच्या प्रचंड संकटातून सुटल्यानंतर त्यांना नशिबाने मात्र साथ दिली नाही.

एक मित्र वाचला, कारण तो आधीच घरी आला होता

या ग्रुपमधील एक तरुण मंगळवारी (१७ मार्च) अस्वस्थ वाटू लागल्याने विमानाने आधीच घरी परतला होता. तो ज्या कारमधून प्रवास करत होता, त्या कारचा अपघात झाल्याचे समजताच त्याला मोठा धक्का बसला. आमदार शंकर जगताप म्हणाले, "केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीने स्थानिक प्रशासनाला मदत करण्याचे आदेश दिले आहेत. मृतदेह विमानाने पिंपरी-चिंचवडमध्ये आणण्यासाठी आवश्यक ती मदत केली जात आहे." तिघांचे शवविच्छेदन झाले असून, नातेवाईक घटनास्थळी रवाना झाले आहेत.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...