"या मातीतच तुमची थडगी खोदली आहेत"; ट्रम्पच्या जमिनीवरील हल्ल्याच्या इशाऱ्यानंतर IRGCचा भीषण प्रत्युत्तराचा इशारा
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर जमिनीवरून हल्ला करण्याची धमकी देताच IRGC भूदलाकडून व्हिडिओतून गर्भित इशारा; म्हणाले, "कित्येक वर्षांपासून संधीची वाट पाहत होतो, तुम्हाला याच मातीत गाडले जाईल"
तेहरान/वॉशिंग्टन: मध्य पूर्वेत सध्या युद्धाचे ढग घनिभूत झाले असून अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावाने उच्चांक गाठला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर जमिनीवरून हल्ला करण्याची धमकी दिल्यानंतर इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) च्या भूदलाने एक व्हिडिओ शेअर करत अमेरिकेला प्रत्युत्तराचा गर्भित इशारा दिला आहे.
IRGC कमांडरचा दणदणीत प्रत्युत्तराचा इशारा
इराणी माध्यमांनी शेअर केलेल्या या व्हिडिओत IRGC भूदलाचा एक कमांडर म्हणतो, "काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी इराणवर जमिनीवरून हल्ला करण्याचा प्रस्ताव दिल्याचे ऐकायला मिळाले. आम्ही कित्येक वर्षांपासून अशा संधीची वाट पाहत आहोत आणि आम्ही त्यासाठी १०० टक्के तयार आहोत." तो पुढे म्हणाला, "आमच्या दारूगोळ्याच्या पेटीतूनच आम्ही तुमच्यासाठी अशी थडगी केली आहेत की तुम्हाला याच मातीत गाडले जाईल. हा त्या प्रत्येकासाठी एक धडा असेल जो इराणच्या भूमीकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करेल." इराणने आपल्या सैनिकांना 'कुराणाचे रक्षक' आणि 'देशाची अभेद्य ढाल' असे संबोधून युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.
ट्रम्पचा इशारा आणि इस्त्रायलपासून हात झटकले
इस्त्रायलने इराणच्या 'साउथ पार्स' गॅस प्रकल्पावर हल्ला केल्यानंतर इराणने प्रत्युत्तर म्हणून कतारच्या गॅस प्रकल्पावर क्षेपणास्त्र हल्ला केला. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी सोशल मीडियावर भूमिका स्पष्ट केली. त्यांनी इस्त्रायलच्या हल्ल्याची माहिती आपल्याला नसल्याचे म्हणत त्यापासून हात झटकले. मात्र, इराणने पुन्हा कतारसारख्या निष्पाप देशावर हल्ला केल्यास अमेरिका इराणचे संपूर्ण गॅस क्षेत्र उद्ध्वस्त करून सोडेल, अशी थेट धमकीही त्यांनी दिली.
एनसीटीसी संचालकांचा राजीनामा आणि गंभीर आरोप
दरम्यान, अमेरिकेच्या नॅशनल काउंटरटेररिझम सेंटरचे (NCTC) संचालक जो केंट यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात अमेरिकन प्रशासनाचे वाभाडे काढले आहे. इराणकडून अमेरिकेला कोणताही धोका नसताना केवळ इस्त्रायल आणि त्यांच्या शक्तिशाली अमेरिकन लॉबीच्या दबावामुळे हे युद्ध लादले गेल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. इस्त्रायलने अमेरिकन मीडियाचा वापर करून खोटा प्रचार चालवला आणि ट्रम्प यांना युद्धाच्या जाळ्यात ओढल्याचेही केंट यांनी म्हटले आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.