सोलापूरमध्ये तापमानाने गाठला 40 अंशांचा टप्पा; उष्माघाताचा वाढता धोका, आरोग्य विभागाचे नागरिकांना आवाहन
दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडू नका; भरपूर पाणी प्या, सूती कपडे वापरा – डॉ. संतोष नवले यांचा सल्ला
सोलापूर: जिल्ह्यात उन्हाचा पारा झपाट्याने वाढत असून तापमानाने 40 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. कडक उन्हामुळे दुपारच्या वेळेत रस्त्यांवरील वर्दळ लक्षणीयरीत्या कमी झाली असून, नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी टोपी, स्कार्फ, गॉगल आणि रुमालाचा आधार घेताना दिसत आहेत. वाढत्या उष्णतेमुळे आरोग्य विभागाकडून उष्माघातापासून बचाव करण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उन्हाचा चटका कायम, थंड पेयांना मागणी
सोलापूर शहरासह ग्रामीण भागात सकाळपासूनच उन्हाचा चटका जाणवू लागतो आहे. दुपारच्या वेळेत वाहनचालक, कामगार, विद्यार्थी आणि व्यापारी वर्गाला विशेष त्रास सहन करावा लागत आहे. उष्णतेपासून बचावासाठी नागरिक ताक, लिंबूपाणी, फळांचे रस आणि थंड पेयांचा आधार घेत असल्याने या पदार्थांच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे.
आरोग्य विभागाचा सल्ला
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी केले आहे. त्यांनी नागरिकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
काय करावे:
- तहान लागली नसली तरी जास्तीत जास्त पाणी प्यावे.
- हलके, पातळ, सच्छिद्र सूती कपडे वापरावे.
- बाहेर जाताना गॉगल, छत्री, टोपी, बूट किंवा चप्पल वापरावी.
- प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी.
- उन्हात काम करताना डोक्यावर टोपी, स्कार्फ किंवा टॉवेल बांधावा.
- ओआरएस, लिंबूपाणी, ताक यांचा नियमित वापर करावा.
- अशक्तपणा, सुस्ती, डोकेदुखी, सतत घाम येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- पाळीव प्राणी व पशुधन यांना सावलीत ठेवावे व पुरेसे पाणी द्यावे.
- घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करावा.
- गर्भवती महिला व आजारी कामगारांची विशेष काळजी घ्यावी.
काय करू नये:
- लहान मुले व पाळीव प्राण्यांना बंद वाहनात ठेवू नये.
- दुपारी 12 ते 4 या वेळेत उन्हात जाणे टाळावे.
- गडद, घट्ट व जाड कपडे वापरू नयेत.
- अतिशारीर श्रमाची कामे दुपारच्या वेळेत टाळावीत.
- उन्हाळ्यात स्वयंपाक करणे टाळावे, स्वयंपाकघरात हवेशीर वातावरण ठेवावे.
- उच्च प्रथिनयुक्त आहार, शिळे अन्न, मद्य, चहा-कॉफी व कार्बोनेटेड पेये टाळावीत. यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते.
- उन्हात वाहन चालवू नये, ज्वलनशील पदार्थांपासून दूर राहावे.
उष्माघाताची लक्षणे दिसताच तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.