पाकिस्तानी निर्मात्याचा मोठा निर्णय! रवींद्रनाथ टागोरांची 130 वर्ष जुनी कथा आता पडद्यावर
'षष्टी' लघुकथेवर आंतरराष्ट्रीय सहनिर्मितीचा चित्रपट; बांगलादेशी दिग्दर्शिका लीसा गाजी सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
मुंबई : भारतीय साहित्यविश्वातील अजरामर व्यक्तिमत्व आणि नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांच्या साहित्यकृतीचे आता पाकिस्तानातून चित्रपट रुपांतर होणार आहे. पाकिस्तानी निर्माते आबिद मर्चंट यांनी टागोर यांच्या १८९३ मध्ये लिहिलेल्या 'षष्टी' या लघुकथेवर आधारित चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला आहे. या घोषणेमुळे साहित्यप्रेमी आणि चित्रपटसृष्टीत उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
हा चित्रपट आंतरराष्ट्रीय सहनिर्मितीच्या स्वरूपात तयार होणार असून पाकिस्तानसह बांगलादेश, अमेरिका, युनायटेड किंगडम, हाँगकाँग आणि ऑस्ट्रेलियाचे कलाकार व तांत्रिक तज्ज्ञ या प्रकल्पात सहभागी होणार आहेत. निर्माते आबिद मर्चंट हे त्यांच्या 'सनत इनिशिएटिव्ह' या बॅनरखाली हा चित्रपट सादर करणार आहेत.
दिग्दर्शनाची धुरा कोणाकडे?
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी बांगलादेशी चित्रपट दिग्दर्शिका लीसा गाजी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. लीसा गाजी या त्यांच्या 'अ हाऊस नेम्ड शहाना' या समीक्षकांनी प्रशंसित चित्रपटासाठी ओळखल्या जातात. त्या ब्रिटिश-बांगलादेशी लेखिका आणि पुरस्कारप्राप्त दिग्दर्शिका असून कोमोला कलेक्टिव्ह या संस्थेच्या सह-संस्थापक आहेत.
महिलांच्या अनुभवांवर आणि त्यांच्या दृष्टीकोनातून कथा सांगण्यावर भर देणाऱ्या लीसा गाजी यांनी 'बिरांगोना: विमेन ऑफ वॉर' या नाटकासाठी संशोधन, सहलेखन आणि अभिनय केला आहे. तसेच 'रायझिंग सायलन्स' या बहुपुरस्कार विजेत्या माहितीपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. टागोरांच्या 'षष्टी' कथेवर आधारित हा चित्रपट आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय साहित्याला नवी ओळख करून देईल, अशी अपेक्षा आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.