महिलांसमोरील दुहेरी नियमांवर भेदक भाष्य; अभिनेत्याच्या पोस्टला सोशल मीडियावरून भरभरून प्रतिसाद
मुंबई : जागतिक महिला दिनानिमित्त अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला. मात्र, प्रसिद्ध मराठी अभिनेता गौरव मालनकर याने केलेली एक पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. महिलांना समाजात सहन कराव्या लागणाऱ्या वेदना आणि दुहेरी नियमांवर भेदक भाष्य करत त्याने केलेली पोस्ट व्हायरल झाली आहे.
'फुलपाखरू', 'पिरतीचा वणवा उरी पेटला' या मालिकांमधून प्रसिद्धी मिळालेल्या गौरव मालनकरने आपल्या पोस्टमध्ये महिलांच्या आयुष्यातील अनेक वास्तववादी मुद्दे मांडले आहेत. त्याने लिहिलेल्या या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "आम्हाला मासिक पाळीच्या वेदना कळणार नाहीत कधीच, आम्हाला लेबर पेन कळणार नाही कधीच, आम्हाला दिवस दिवस साडी नेसून, केसांना असंख्य पिना टोचून शूटिंगला उभं राहण्याचं दुःख कळणार नाही कधीच."
पुरुष आणि महिलांसाठी असलेल्या दुहेरी नियमांवर बोट ठेवत तो म्हणतो, "आमच्याकडे बनियान न घालण्याची मोकळीक आहे; पण तुम्हाला ब्रा न घालण्याची मुभा नाही कधीच (म्हणजे breast cancer चा आकडा कितीही वाढो)." तसेच, महिलांच्या अवयवांकडे निरखून बघणाऱ्या नजरांचा उल्लेख करताना तो म्हणतो, "संबंध कपडे परिधान करून सुद्धा रस्त्यावरून चालताना तुमच्या अवयवांकडे निरखून बघणाऱ्या नजरा पचवायची ताकद आमच्यात येणार नाही कधीच."
पुरुषप्रधान संस्कृतीवर प्रहार करताना तो पुढे म्हणतो, "वर्किंग वुमन असलात तरी so called संस्कारी राहण्याची फुशारकी लोकांनी थोपवलेली जबाबदारी आम्हाला पार पाडता येणार नाही कधीच. मी माझ्या बायको, प्रेयसीला पूर्ण स्वातंत्र्य देतो, हे ह्यात सुद्धा एक मेल इगो आहे हे आम्हाला कळणार नाही कधीच."
"जग कितीही काळाच्या पुढे जात असलं तरी तुमच्या वाट्याला येणारे संघर्ष काही अंशी तरी राहणार आहेतच दुर्दैवाने. जग पुरुषप्रधान संस्कृतीतून लवकरात लवकर बाहेर पडे ही तुम्हाला महिलादिनी शुभेच्छा.. तुम्ही fighter आहात. Happy women's day girls," अशी शुभेच्छा देत त्याने पोस्टची सांगता केली आहे.
गौरव मालनकरच्या या पोस्टला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून महिलांच्या भावना समजून घेणाऱ्या या पोस्टचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.