अधिवेशनादरम्यान मुंबईत एक्शन; 'मंत्र्यांना ब्रीफिंग देणार नाही' म्हणणाऱ्या अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई, मुनगंटीवारांचा अधिकाऱ्यांना इशारा
क्रांती न्युज वृत्त:
राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुंबईत प्रशासन आणि मंडळींमधील वाद समोर आला आहे. पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी ब्रीफिंगला न आल्याने वरिष्ठ IAS अधिकारी एम. देवेंद्र सिंग यांचे निलंबन करण्यात आले आहे.
२०११ च्या बॅचचे आयएएस अधिकारी एम. देवेंद्र सिंग हे सध्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव आहेत. विधानसभेतील चर्चेदरम्यान मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांना ब्रीफिंगसाठी बोलावले होते; मात्र ते उपस्थित न राहिल्याने तालिका अध्यक्ष दिलीप लांडे यांच्या सूचनेनंतर सामान्य प्रशासन विभागाने ही कारवाई केली. अतिरिक्त सचिव व्ही. राधा यांच्या सहीने निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले.
अखिल भारतीय सेवा (शिस्त व अपील) नियमांन्वये करण्यात आलेल्या या कारवाईनुसार, निलंबन काळात देवेंद्र सिंग यांचे मुख्यालय मुंबईच राहील. त्यांना विभागीय आयुक्तांच्या परवानगीशिवाय मुंबई सोडता येणार नाही. तसेच, निलंबन काळात त्यांना कोणतीही खासगी नोकरी अथवा व्यवसाय करण्यास मनाई आहे. निर्वाह भत्ता मिळण्यासाठी त्यांनी इतर कोणत्याही उपजीविकेत गुंतलेले नसल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागेल.
दरम्यान, या कारवाईबाबत माहिती देताना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले, "एक IAS अधिकारी मंत्र्यांना ब्रीफिंग देणार नाही, असे म्हणणे हा संविधानाचा अपमान आहे. अशा अधिकाऱ्याला तुरुंगवासाची शिक्षा होण्याची तरतूद आहे. काही अधिकारी हे 'आमदार बदलतील, पण आम्ही कायम' या अहंकारात वागतात. त्यांनी हे लक्षात ठेवावे की सन्मान द्या आणि सन्मान घ्या."
या कारवाईमुळे प्रशासनात खळबळ उडाली असून, मंत्री आणि अधिकाऱ्यांमधील संवादाच्या पद्धतीवरुन नवी चर्चा सुरू झाली आहे.

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.