लाचखोरी प्रकरणी नरहरी झिरवाळ यांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा; पुराव्यांअभावी क्लीन चिट
मुंबई : - अन्न व औषध प्रशासन विभागातील कथित लाचखोरी प्रकरणी मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणी झिरवाळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुरावे उपलब्ध झाल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) कारवाई करेल आणि त्यासाठी एसीबीला पूर्ण स्वातंत्र्य असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
अन्न व औषध प्रशासन विभागातील कर्मचारी राजू ढेरिंगे याला लाच स्वीकारताना एसीबीने अटक केली होती. या घटनेनंतर संबंधित विभागाचे मंत्री म्हणून झिरवाळ यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला पूर्ण स्वायत्तता देण्यात आली आहे. उद्या माझ्या कार्यालयातील कोणी गैरव्यवहार केला, तरी त्याच्यावर निश्चित कारवाई होईल. मंत्र्यांच्या विरोधात पुरावे असते, तर निश्चितच कारवाई झाली असती. एसीबी कोणतीही कारवाई करण्यापूर्वी माहिती गोळा करते, संभाषणांच्या नोंदी तपासते आणि त्यानंतरच निर्णय घेते. आतापर्यंतच्या तपासात मंत्र्यांचे नाव आलेले नाही."
दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण गाजण्याची शक्यता आहे. विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी सुरू असून चौकशीतून सर्व बाबी स्पष्ट होतील, असे मंत्री झिरवाळ यांनी म्हटले आहे. "अधिवेशनात उपस्थित होणाऱ्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्यास आम्ही तयार आहोत," असे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणात झिरवाळ यांचे खासगी सचिव रामदास गाडे यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. त्यांना अन्न व औषध प्रशासन विभागातून कार्यमुक्त करून त्यांच्या मूळ आस्थापनेत, म्हणजेच पशुवैद्यकीय विभागात, परत पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
.jpeg)
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.