अर्थसंकल्प सत्र आजपासून; 'लाडकी बहीण', शेतकरी कर्जमाफी आणि AI तंत्रज्ञानावर होणार भर! महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी सादर केली रुपरेषा
मुंबई: - महाराष्ट्र विधानमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून (२३ फेब्रुवारी) सुरू होत असून त्यापूर्वी महायुती सरकारच्या तिन्ही नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन अधिवेशनाची रुपरेषा सादर केली. दिवंगत नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र उभारण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. निवडणुकीदरम्यान केलेल्या घोषणा पूर्ण करण्यापासून ते कर्जमाफी आणि AI तंत्रज्ञानाच्या वापरापर्यंतच्या विविध मुद्द्यांवर नेत्यांनी भाष्य केले.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना चर्चेचे आवाहन केले. ते म्हणाले, "विरोधकांनी नुसते हवेत गोळीबार करून पळून जाणे योग्य नाही. त्यांनी आपल्या शंका आणि प्रश्न अधिवेशनात मांडावेत, आम्ही त्यांची सविस्तर उत्तरे देऊ. विरोधकांना भरपूर चर्चेची संधी देऊ."
अजित पवार यांच्या कार्याचा गौरव करताना फडणवीस म्हणाले, "अजितदादांनी कधीही आर्थिक शिस्त मोडली नाही. अर्थसंकल्पाची उत्तम तयारी त्यांनी केली होती. कुठल्याही मुख्यमंत्र्यांना निर्धास्तपणे अर्थखाते देता येईल, असे व्यक्तिमत्त्व होते ते. आर्थिक शिस्तीत बसत नसेल तर ते स्पष्ट नकार द्यायचे, पण आवश्यकतेनुसार मार्गही काढायचे."
तसेच, सुनेत्रा पवार यांच्याबद्दल विश्वास व्यक्त करताना ते म्हणाले की, त्या पहिल्यांदाच अधिवेशनाला सामोरे जात असल्या तरी त्यांचा राजकीय अनुभव मोठा आहे आणि त्या दादांप्रमाणेच ठामपणे अधिवेशनाला सामोरे जातील.
फडणवीस यांनी अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला. केंद्राकडून महाराष्ट्राला मिळणाऱ्या निधीत २० हजार कोटींची वाढ झाली आहे, तर ९८ हजार ३०० कोटी रुपयांचा कर परतावा (GST) मिळणार आहे. दावोसमध्ये झालेल्या ३० लाख कोटींच्या करारांची वस्तुस्थिती या अर्थसंकल्पात स्पष्ट केली जाईल, असेही ते म्हणाले.
AI तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना फायदा:
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे 'महाविस्तार' या नावाचे एक एआय अॅप तयार करण्यात आले आहे. याबाबत फडणवीस म्हणाले, "प्रत्येक शेतकऱ्याला या अॅपचा फायदा होईल. पिकाचा फोटो काढताच ते अॅप पिकाची अवस्था काय आहे, याची माहिती शेतकऱ्याला देईल."
विरोधकांनी पाठवलेल्या पत्रावर निशाणा साधताना ते म्हणाले, "विरोधकांनी सहा पानांचे आणि १८ मुद्द्यांचे पत्र पाठवले आहे. जागतिक मातृभाषा दिनी आपल्या मातृभाषेच्या अनेक चुका या पत्रात आहेत. बातमीतील परिच्छेद जसेच्या तसे त्यांनी पत्रात टाकले आहेत."
सुनेत्रा पवार यांची भूमिका:
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, "यंदाचे अधिवेशन हे महायुती सरकारचे दुसरे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. महायुतीवर लोकांनी विश्वास दाखवला, त्याला न्याय देण्याचे काम सरकार करेल. दिवंगत अजितदादांनी ११ वेळा अर्थसंकल्प मांडला. विकासाच्या बाबतीत त्यांनी कधीही तडजोड केली नाही. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचा त्यांचा संकल्प होता, त्यावर आम्ही काम करू. लाडकी बहीण योजना बंद होईल, असे आरोप झाले होते; मात्र दादांनी त्यासाठी तरतूद करून ही योजना कायम सुरू राहील, याची काळजी घेतली."
एकनाथ शिंदे यांचे आश्वासन:
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "अर्थसंकल्प मांडायचा म्हटले की सर्वांचे लक्ष अजितदादांकडे असे. आज ते आपल्यात नाहीत, या दुःखाचे सावट या अर्थसंकल्पावर आहे. नियतीसमोर आपले काही चालत नाही. देवेंद्र फडणवीस यांना राज्याच्या अर्थव्यवस्थेची नाडी माहीत आहे. आम्ही सर्वसामान्यांचे सरकार म्हणून काम केले. दावोसमध्ये ३० लाख कोटींचे करार केले, त्यातून ४० ते ५० लाख लोकांना रोजगार मिळेल."
शिंदे यांनी निवडणुकीदरम्यान केलेल्या घोषणांची आठवण करून देत आश्वासन दिले की, "निवडणुकीच्या वेळी ज्या घोषणा महायुती सरकारने केल्या होत्या, त्या प्रत्येक घोषणा आम्ही योग्य वेळी पूर्ण करू."
विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले, "विरोधकांमध्ये संवादाचा अभाव आहे. त्यांनी सर्वसामान्य लोकांसाठी भांडणे गरजेचे आहे. त्यांनी आमच्याकडून लोकांची कामे करून घेणे अपेक्षित आहे; पण तसे ते करत नाहीत."
.jpeg)
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.