⚡ ब्रेकिंग News

राजकारणाच्या पटलावर नवीन ठाकरेंची एन्ट्री? तेजस ठाकरेंच्या आंदोलनातील उपस्थितीने चर्चा जोरात


 शिवाजी पार्क आणि सेना भवन परिसरात ११ ऑक्टोबर रोजी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ जमलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ठिय्या आंदोलन; आदित्य ठाकरेंसोबत तेजस ठाकरे सेना भवन परिसरात दाखल; पोलिसांची गाडी अडवून धरणारे तेजस; वन्यजीव संशोधन आणि जैवविविधतेशी संबंधित कामासाठी ओळखले जाणारे तेजस आता सक्रिय राजकारणात येणार का?; मंत्री नितेश राणे यांचा 'नवीन प्रजातीचे किडे'चा टोला; प्रवीण दरेकर म्हणाले 'आणखी एक ठाकरे रस्त्यावर आले'; अनिल परब म्हणाले 'हे आंदोलन राजकीय राहिले नाही'

क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे

मुंबई : ठाकरे कुटुंबातील आणखी एक चेहरा आता राजकारणाच्या मैदानात उतरणार का? हा प्रश्न उपस्थित होण्याचं कारण ठरलंय ते म्हणजे तेजस ठाकरे यांची रविवारी झालेल्या आंदोलनातील उपस्थिती. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना सोडवण्यासाठी झालेल्या ठिय्या आंदोलनात तेजस ठाकरे सहभागी झाले. त्यामुळे आतापर्यंत राजकारणापासून काहीसे दूर राहिलेले तेजस ठाकरे आता सक्रिय राजकारणात येणार का, याची चर्चा सुरू झाली आहे. मुंबईतील शिवाजी पार्क आणि सेना भवन परिसरात ११ ऑक्टोबर रोजी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ जमलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचे नेते आक्रमक झाले. आदित्य ठाकरे यांच्यासोबत तेजस ठाकरेही सेना भवन परिसरात दाखल झाले. आंदोलनकर्त्यांच्या सुटकेसाठी झालेल्या ठिय्या आंदोलनात तेजस ठाकरे सहभागी झाले. या घडामोडींमुळे ठाकरे कुटुंबातील आणखी एक सदस्य सक्रिय राजकीय भूमिकेत दिसू लागल्याची चर्चा रंगली आहे.

उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि आदित्य ठाकरे यांचे बंधू असलेले तेजस ठाकरे हे प्रामुख्याने वन्यजीव संशोधन आणि जैवविविधतेशी संबंधित कामासाठी ओळखले जातात. आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थी राजकारणापासून निवडणुकीच्या राजकारणापर्यंत सक्रिय भूमिका घेतली. मात्र, तेजस ठाकरे यांची सार्वजनिक प्रतिमा तुलनेने राजकारणापासून दूर राहिलेल्या व्यक्तीची राहिली आहे. ते सुरुवातीपासूनच राजकारणापासून लांब राहिले आहेत.

तेजस ठाकरे यांच्या याआधीच्या राजकीय कार्यक्रमांतील उपस्थितीचा कालानुक्रमे आढावा घेताना एक गोष्ट लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. याआधी एखाद्या राजकीय मेळाव्यात, सभेत किंवा आंदोलनात ते उपस्थित होते. अनेकदा तेजस ठाकरे हे पक्षाच्या कार्यक्रमात उपस्थित असलेले पाहायला मिळाले आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी ही ते उद्धव ठाकरे यांच्या सोबत दिसले होते. विधानसभा निवडणुकीवेळी आदित्य ठाकरे यांच्या प्रचारावेळी ही त्यांनी उपस्थिती लावलेली पाहायला मिळाली होती. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण तुरुंगातून सुटल्यावर मातोश्रीला गेले होते. त्यावेळीही तेजस ठाकरे दिसले होते. माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि तेजस ठाकरे यांचा ही व्हिडीओ वायरल झाला होता. दसरा मेळावा आणि पक्षाचा वर्धापन दिनानिमित्त अनेक वेळा तेजस ठाकरे मंचाच्या समोर बसलेले पाहायला मिळाले आहेत. मराठीच्या मुद्द्यावर ज्यावेळी ठाकरे बंधू एकत्र येत पहिल्यांदा सभा घेतली तेव्हा ही तेजस ठाकरे उपस्थित होते. मुंबई महापालिकेच्या प्रचाराच्या वेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत तेजस ठाकरेही शाखा भेटीच्या दौऱ्यात उपस्थित होते. NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावर शिवाजी पार्कात झालेल्या आंदोलनातही तेजस ठाकरे काळ्या रंगाचे टी शर्ट घालून सहभागी झाला होता.

ठाकरे कुटुंबात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन प्रमुख राजकीय चेहरे आहेत. आदित्य ठाकरे हे निवडणुकीच्या राजकारणात सक्रिय आहेत, तर अमित ठाकरे यांनीही मनसेच्या माध्यमातून राजकीय भूमिका घेतली आहे. आता तेजस ठाकरेही राजकारणात येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तेजस ठाकरेंच्या या उपस्थितीमुळे सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी खोचक टोलेबाजी केली आहे. मंत्री नितेश राणे यांनी टीका करताना म्हटले आहे, नवीन प्रजातीचे किडे तिथे आले असतील म्हणून तेजस ठाकरे आले असतील. आमच्या नितेश राणेंच्या भाषेत सगळे ठाकरे आता वाकरे झाले आहेत. आपल्या शोधातून बाहेर येत आणखी एक ठाकरे रस्त्यावर आले असं समजायचं असा टोला प्रवीण दरेकर यांनी लावला आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी म्हटले आहे की हे आंदोलन काही राजकीय राहिले नाही, सर्वसामान्य नागरिकांचे हे आंदोलन आहे.

या प्रकरणामुळे मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एका बाजूला तेजस ठाकरेंच्या उपस्थितीमुळे नव्या चर्चांना उधाण आले असता, दुसऱ्या बाजूला सत्ताधाऱ्यांनी टोलेबाजी केली आहे. या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तरुण तेजस ठाकरे यांची रविवारी झालेल्या आंदोलनातील उपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना सोडवण्यासाठी झालेल्या ठिय्या आंदोलनात तेजस ठाकरे सहभागी झाले. याआधीही अनेक वेळा तेजस ठाकरे यांच्या राजकीय कार्यक्रमांच्या उपस्थितीने तेजस ठाकरे राजकारणात येणार? अशा चर्चा रंगल्या होत्या अशातच रविवारी पोलिसांच्या गाडीसमोर हात खुले करून उभे राहिल्याने पुन्हा या चर्चांना उधाण आले आहे. तेजस ठाकरे म्हणजे वन्यजीव संशोधनाच्या क्षेत्रात काम करणारे असा त्यांचा आतापर्यंतचा परिचय. मात्र, रविवारी झालेल्या आंदोलनात शिवसेना भवन परिसरात आदित्य आणि अमित ठाकरे भूमिका मांडत असताना, भावांच्या खांद्याला खांदा लावून पोलिसांची गाडी अडवून धरणारे तेजस ठाकरे हे पाहायला मिळाले.




Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...