क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे
मुंबई - मुख्य निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner) ज्ञानेश कुमार यांच्या निवडणूक आयोगातील बेबंदशाहीविरोधात अवघ्या देशामध्ये संतापाचा उद्रेक झाला असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे.
तर, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधामध्ये आता ठाकरे बंधूंनीसुद्धा एल्गार पुकारला आहे. ४ ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये विराट मोर्चा निघणार असून या मोर्चाची जय्यत तयारी करण्यात येत आहे.
या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज (२९ सप्टेंबर) ठाकरे बंधूंची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी मोर्चाची दिशा सांगितली.
पत्रकार परिषदेत मोर्चाची दिशा आणि रूपरेषा स्पष्ट करताना राज ठाकरे म्हणाले, "चार तारखेला हा संयुक्त मोर्चा निघेल. भायखळ्यावरून हा मोर्चा निघेल आणि मुंबई महानगरपालिकेच्या समोर तिथे व्यासपीठ असेल आणि तिथे त्याचे रूपांतर सभेमध्ये होईल."
"सकाळी दहा वाजताची वेळ आहे," असे राज ठाकरे म्हणाले.
"मोर्चात काय बोलायचे ते आम्ही बोलू. परंतु, हा निवडणूक आयोगाच्या विरोधातला मोर्चा आहे. गेली अनेक वर्षे या विषयांवर आम्ही बोलत आलोय. २०१७-१८ मध्ये मी अनेक नेत्यांना या संदर्भात भेटलो होतो. ईव्हीएम मशीनच्या संदर्भात मी भेटलो होतो, या विषयावर सविस्तर बोलणं चार तारखेला होईल," असे राज ठाकरे म्हणाले.
या मोर्चात पक्षीय राजकारण नसेल हे स्पष्ट करत राज ठाकरे पुढे म्हणाले, "या मोर्चानंतर त्याची पुढील रूपरेषा आम्ही ठरवू. आम्ही सर्वच राजकीय पक्षांना आमंत्रण देणार आहोत. सत्ताधारी पक्षातील लोकांना व्यासपीठावर यायचं असेल तर ते देखील येऊ शकतात. निवडणूक आयोगाचा गेल्या काही वर्षांतला जो कारभार आहे, त्या विरोधात हा मोर्चा आहे."
राज ठाकरे पुढे म्हणाले की, "प्रत्येकाला फोन करून सांगितले जाईल. या मोर्चात कोणत्याही राजकीय पक्षाचे झेंडे नसतील. यात सर्वांच्या हातात तिरंगाच असणार आहे. हा विषय या देशातील लोकशाही वाचवण्याचा आणि संविधान वाचवण्याचा आहे. त्यामुळे सर्वांच्या हातात तिरंगाच असेल."
विरोधी पक्षाला त्यांच्या पराभवाचे खापर निवडणूक आयोगावर सोडायचे आहे', असा आरोप भाजपकडून केला जात आहे.
याबाबत पत्रकारांनी विचारले असता, राज ठाकरे यांनी अतिशय मार्मिक आणि एका वाक्यात टोला लगावला.
राज ठाकरे म्हणाले की, "मराठीमध्ये एक म्हण आहे - खाई त्याला खवखवे," असे म्हणत त्यांनी भाजपचा विषय एका वाक्यात संपवला.
| मुद्दा | तपशील |
| मोर्चा | ४ ऑक्टोबर, निवडणूक आयोगाविरोधात |
| आयोजक | ठाकरे बंधू (मनसे + शिवसेना UBT) |
| मार्ग | भायखळा ते मुंबई महानगरपालिका |
| वेळ | सकाळी १० वाजता |
| सभा | महापालिकेसमोर व्यासपीठ |
| आमंत्रण | सत्ताधारी पक्षांसह सर्वांना |
| झेंडे | कुठल्याही पक्षाचे नाहीत; फक्त तिरंगा |
| अजेंडा | लोकशाही व संविधान वाचवणे |
| भाजपचा आरोप | 'पराभवाचे खापर आयोगावर' |
| राज ठाकरेंचं उत्तर | 'खाई त्याला खवखवे' |

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.