⚡ ब्रेकिंग News

जैवइंधन निर्मितीमुळे शेतकरी होणार समृद्ध: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

 


जैवइंधन निर्मितीमुळे शेतकरी होणार समृद्ध: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

​खंडाळ्यातील 'राज क्लीन एनर्जी' प्रकल्पाचे थाटात उद्घाटन; आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नाला बळ

क्रांती न्यूज - संपादक - सचिन मेनकुदळे​

खंडाळा :

"देशाची इंधन आयात कमी करून, इंधनावर खर्च होणारा पैसा शेतकऱ्यांच्या खिशात गेला पाहिजे, हेच आमचे स्वप्न आहे. जैवकचरा आणि शेतीमालावर प्रक्रिया करून इंधन निर्मिती करणारे 'राज क्लीन एनर्जी'सारखे प्रकल्प हे देशासमोरील अनेक प्रश्नांवरचे एकच प्रभावी उत्तर आहेत. यामुळे गाव आणि शेतकरी समृद्ध होईल आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न निश्चितच साकार होईल," असा ठाम विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

​'राज प्रोसेस इक्विपमेंट्स अँड सिस्टिम्स प्रा. लि.'च्या वतीने खंडाळा येथे उभारलेल्या 'कॉम्प्रेस्ड बायोगॅस' (CBG) प्रकल्पाचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मंत्री गडकरी म्हणाले की, या प्रकल्पाच्या तंत्रज्ञानामुळे ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणार आहे. "खंडाळ्यातील तरुणाला नोकरीसाठी आता पुण्याला जाण्याची गरज भासणार नाही; उलट पुण्यात शिक्षण घेतलेला इंजिनिअर नोकरीसाठी खंडाळ्यात येईल, असे उलटे चक्र आता फिरणार आहे. देशाच्या जीडीपीमध्ये ६५ टक्के लोकसंख्या असलेल्या कृषी क्षेत्राचे योगदान केवळ १४ टक्के आहे. हे चित्र बदलण्यासाठी पारंपरिक शेती सोडून शेतकरी आता आयात-पर्यायी इंधन उत्पादनाकडे वळले पाहिजेत," असे आवाहन त्यांनी केले.

साखर कारखानदारीसमोरील आव्हानांवर भाष्य करताना गडकरी म्हणाले, "केवळ साखरेवर कारखाने चालवणे आता कठीण झाले आहे. त्यामुळे इथेनॉल, बायो-सीबीजी आणि हायड्रोजन यांसारख्या उपउत्पादनांची निर्मिती करणे ही काळाची गरज आहे. खंडाळ्यातील हा सीबीजी प्रकल्प लवकरच केंद्र सरकारच्या गॅस पाइपलाइनला जोडला जाईल, ज्यामुळे परकीय चलनात मोठी बचत होईल."

यावेळी गडकरी यांनी 'राज प्रोसेस इक्विपमेंट्स'चे अनिलराज पिसे यांचे विशेष कौतुक केले. "अनिलराज पिसे या तरुण उद्योजकाने धाडस दाखवून संशोधन केले आणि आज ३५ देशांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. अशा ध्येयवेड्या तरुणांमुळेच ग्रामीण भागात क्रांती घडत आहे," असे ते म्हणाले.

प्रास्ताविकात 'राज प्रोसेस इक्विपमेंट्स'चे कार्यकारी व्यवस्थापक अनिलराज पिसे म्हणाले, "आम्ही गेल्या २५ वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत असून जगभरातील ३५ देशांमध्ये आमचे तंत्रज्ञान पोहोचवले आहे. ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे हेच आमच्या कंपनीचे मुख्य ध्येय आहे." आभार प्रदर्शन विजयराज पिसे यांनी केले.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...