⚡ ब्रेकिंग News

‘बायको अशोक खरातबाबत काय काय म्हणाली?’ – कल्पना खरातनेही आता हात वर केले; न्यायालयात हादरवणारा युक्तिवाद


‘सगळी खाती पती चालवत होते’, अटकपूर्व जामिनासाठी वकिलांनी केला दावा; सरकारी वकील म्हणाले – ‘खात्यातून सात कोटींचे व्यवहार’

अहिल्यानगर: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज अहिल्यानगर येथील राहता न्यायालयात सुनावणी झाली. ३१ मार्चपासून फरार असलेल्या कल्पना खरातने न्यायालयात आपला बचाव करताना सर्व आरोप पती अशोक खरातवर ढकलले आहेत. तिच्या वकिलांनी स्पष्ट केले की, कल्पना खरातची सर्व बँक खाती आणि आर्थिक व्यवहार तिचा पती अशोक खरात ऑपरेट करत होता. तिला कोणत्याही प्रकरणात थेट सहभाग नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला. मात्र, सरकारी वकील आणि तपास अधिकाऱ्यांनी कल्पना खरातच्या खात्यातून सात कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे न्यायालयात सादर केले.

अटकपूर्व जामिनासाठी काय युक्तिवाद?

कल्पना खरातचे वकील प्रशांत गिरी यांनी न्यायालयात मोठा युक्तिवाद केला. ते म्हणाले, “तब्बल दीड वर्षांनंतर फिर्यादीने गुन्हा दाखल केला आहे. अशोक खरात यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर शिर्डी येथील गोंदकर यांनी जुन्या व्यवहाराचा फायदा घेण्यासाठी शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल केला. फिर्यादी म्हणतो की किरण सोनवणे याने वेळोवेळी अशोक खरात याला भेटून पैसे दिले. मात्र, या मीटिंगमध्ये कल्पना खरात उपस्थित नव्हती. फिर्यादीच्या एफआयआरमध्येही स्पष्ट म्हटले आहे की, कुठल्याही व्यवहाराला कल्पना खरात केव्हाच उपस्थित नव्हती.”

दीड वर्षांनी का गुन्हा?’  

वकील प्रशांत गिरी पुढे म्हणाले, “फिर्यादीकडे दिवाणी न्यायालयात जाण्याची मुभा होती, संधी होती, तरीही ते गेले नाहीत. जमिनीचा व्यवहार झाल्यानंतर फिर्यादीने जवळपास एक वर्ष कुठल्याही न्यायालयात दाद मागितली नाही. फक्त आणि फक्त अशोक खरात यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर जमीन परत मिळवण्यासाठी फिर्यादीने हा गुन्हा दाखल केला. हे स्पष्ट दर्शवते की, ही फसवणूक नसून दिवाणी वाद आहे.” युक्तिवादाचा हा भाग ऐकून न्यायालयानेही गंभीर दखल घेतली.

खाती पती चालवत होते’  

कल्पना खरातच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, “कल्पना खरातची सर्व बँक खाती तिचे पती अॅशोक खरात ऑपरेट करत होते. फक्त पत्नीच्या खात्यातून पैसे गेले म्हणून तिला आरोपी करता येणार नाही. अशोक खरात याने व्याजाची रक्कम मागितली आहे, कल्पना खरात हिने कधीही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे फिर्यादीकडून व्याजाची मागणी केली नाही. कल्पना खरात आयकर विभागाला संपूर्ण आयकर भरते. ‘शिवसंकल्प हार्डवेअर’ हा तिचा व्यवसाय आहे. तसेच कल्पना खरातच्या विरहित जमिनीचा व्यवहार झाला आहे, त्यामुळे तिला आरोपी करू नये. याआधी कल्पना खरातविरोधात फसवणुकीचा एकही एफआयआर नाही.”

सरकारी वकिलांचा दमदार युक्तिवाद  

सरकारी वकील बी. डी. पानगव्हाणे यांनी या युक्तिवादाला जोरदार उत्तर दिले. ते म्हणाले, “आरोपीचे वकील म्हणतात की त्यांच्या खात्यातून व्यवहार झाले हे मान्य आहे. पण त्या म्हणतात की, ‘मी ते व्यवहार केले नाहीत, माझ्या पतीने केले.’ तर मग मुखत्यारपत्र करण्यासाठी कल्पना राहत्याला का आल्या होत्या? २३ तारखेला खरेदी झाली असली तरी खरेदीखत २२ तारखेलाच का बनवले? आणि त्याच दिवशी मुखत्यारपत्र का बनवले? जमीन खरेदी व्यवहाराच्या कागदपत्रांवर कल्पना खरात यांची सही आणि अंगठा आहे. मुखत्यारपत्रामध्ये कल्पना खरात हिने २ टक्के व्याज दर तीन महिन्याला देण्यात यावे हे ठरवले आहे.”

‘सात कोटींचे व्यवहार  

पुढे बोलताना पानगव्हाणे म्हणाले, “कल्पना खरातच्या खात्यातून फिर्यादीला पैसे गेले आहेत. जितेंद्र शेळके आणि महेंद्र शेळके हे या व्यवहाराचे साक्षीदार आहेत, त्यांचे जबाब झाले आहेत. आरोपीला सावकारी परवाना होता का? आम्ही चौकशी केली असता दोघांनाही सावकारी परवाना नव्हता. मूळ आरोपी अशोक खरात आणि कल्पना खरात यांची तीन राष्ट्रीयकृत बँकांत खाती आहेत. कल्पना खरात हिला हा व्यवहार मान्य होता, त्यामुळेच तिने चेक दिले आणि रक्कम पाठवली. जर कल्पना खरात म्हणते की तिचे सगळे व्यवहार तिचे पती करत होते, तर मग तिने त्यांच्याविरुद्ध तक्रार का दाखल केली नाही?”

तपास अधिकाऱ्यांची माहिती  

तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात कल्पना खरातच्या खात्याचा तपशील सादर केला. त्यानुसार, कल्पना खरातच्या खात्यावरून सात कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. तपास अधिकाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला की, “कल्पना खरात ही कुठेही नोकरीला नाही, कोणताही व्यवसाय नाही, तरी तिच्या खात्यातून एवढी मोठी रक्कम कशी गेली? तसेच अशोक खरात यांच्या ४० टक्के मालमत्तेत कल्पना खरात भागीदार आहे. त्यामुळे अशोक खरातचे सर्व व्यवहार कल्पना खरात यांना माहीत होते. सरकारी कार्यालयात प्रत्येक खरेदीवेळी कल्पना खरात गेली आहे.” या मुद्द्यांवरून तपास अधिकाऱ्यांनी कल्पना खरातचा सहभाग असल्याचा दावा केला.

पत्नीने पतीवरच ढकलले आरोप  

सुनावणीदरम्यान हे स्पष्ट झाले की, कल्पना खरातने सर्व जबाबदारी आपल्या पती अशोक खरातवर ढकलतानाच ‘मला काहीही माहीत नाही’ अशी भूमिका घेतली आहे. वकिलांनी तिच्या अटकपूर्व जामिनाची मागणी केली असली तरी सरकारी बाजूने सात कोटींचे व्यवहार आणि कागदपत्रांवरील सही यामुळे तिची भूमिका संशयास्पद असल्याचे स्पष्ट केले. न्यायालयाने सर्व युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर निकाल सुरक्षित ठेवला आहे.

अशोक खरात प्रकरणाची पार्श्वभूमी  

अशोक खरात याच्यावर अनेक गंभीर आरोप आहेत. त्याने भोंदूबाबा बनून अनेकांना आपल्या जाळ्यात ओढले. जमिनीचे व्यवहार, बँक घोटाळे, सावकारी व्यवसाय अशा अनेक प्रकरणांमध्ये त्याचे नाव आले आहे. पोलिसांनी त्याला आधीच अटक केली आहे. आता त्याची पत्नी कल्पना खरातही फरार असून तिने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी न्यायालय निश्चित करेल

कल्पना खरातने अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या अर्जावर आज न्यायालयात जोरदार युक्तिवाद झाला. तिच्या वकिलांनी तिला निर्दोष ठरवत ‘सगळे व्यवहार पती करत होते’ असे म्हटले. मात्र, सरकारी वकिलांनी तिच्या खात्यातील सात कोटी रुपयांचे व्यवहार, कागदपत्रांवरील सही, मुखत्यारपत्र आणि सरकारी कार्यालयातील हजेरी या पुराव्यांद्वारे तिचा सहभाग असल्याचे सिद्ध केले. कल्पना खरातने पतीवर आरोप ढकलत ‘हात वर’ केले असले तरी, तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ती या कारस्थानात पूर्णपणे साथीदार असल्याचे चित्र आहे. न्यायालयाने निकाल सुरक्षित ठेवला असून, पुढील आठवड्यात याप्रकरणी निर्णय अपेक्षित आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...