⚡ ब्रेकिंग News

पुण्यात गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल्स बंद होण्याची शक्यता, नागरिक हैराण

  पुण्यात गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल्स बंद होण्याची शक्यता, नागरिक हैराण

 इराण-इस्रायल संघर्षाचा फटका; व्यावसायिक सिलेंडरपुरवठा थांबल्याने खानावळी, मिठाई दुकानांवर संकट

पुणे: इराण-इस्रायल संघर्षाचे पडसाद आता थेट पुणेकरांच्या स्वयंपाकघरात आणि जेवणाच्या ताटात उमटू लागले आहेत. केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता थांबवल्याने पुण्यासह राज्यभरात प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. याचा सर्वात मोठा फटका हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळी आणि मिठाई व्यावसायिकांना बसला असून, पुढील काही दिवसांत हे व्यवसाय बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत असल्याचा दावा पुरवठा विभागाकडून करण्यात येत असला, तरी शिवाजीनगरसह अनेक भागांतील गॅस एजन्सीसमोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. मोबाइलवरून गॅस बुक करणे शक्य होत नसल्याने आणि बुक केल्यानंतरही सिलिंडर घरी न येण्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

खानावळी बंद होण्याची शक्यता

पुण्यात मोठ्या प्रमाणात शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी आणि नोकरदार वर्ग खानावळींवर अवलंबून आहे. मात्र, गॅसच्या तुटवड्याने या खानावळींचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. अनेक खानावळी मालकांनी आज संध्याकाळपर्यंतच पुरेल इतकाच गॅस शिल्लक राहिल्याने विद्यार्थ्यांचे पैसे परत करण्याची वेळ आल्याचे सांगितले आहे. परिणामी, हजारो विद्यार्थी आणि बॅचलर यांच्यासमोर जेवणाचे संकट निर्माण झाले आहे.

मिठाईवर संक्रांतच संकट

गॅसचा तुटवडा थेट मिठाईच्या दरावरही परिणाम करणार आहे. व्यावसायिक सिलेंडरच्या किमती वाढल्याने मिठाईच्या किमती वाढवण्याशिवाय पर्याय नसल्याचे मिठाई विक्रेत्यांनी सांगितले. पुण्यातील प्रसिद्ध काका हलवाई मिठाईचे मालक युवराज गाढवे म्हणाले, "आम्ही पर्याय म्हणून डिझेल किंवा इलेक्ट्रिक शेगड्यांचा वापर करत आहोत; मात्र गॅसपुरवठा खंडित झाल्याने व्यवसायावर गंभीर परिणाम होऊ लागला आहे."

पुण्याबाहेरही तेच चित्र

पुण्यासह सोलापूर, अकोला, ठाण्यातही असाच तुटवडा जाणवत आहे. सोलापुरातील प्रसिद्ध सुधा उपहारगृहात केवळ एक-दोन दिवस पुरेल इतकाच गॅस साठा शिल्लक असून, पुरवठा सुरू न झाल्यास हॉटेल्स एक-एक करून बंद करण्याशिवाय पर्याय राहणार नसल्याचे मालक रोहन किणगी यांनी स्पष्ट केले. अकोल्यातील ४०० हून अधिक हॉटेल्स, कॅटरिंग व्यावसायिकांसमोरही तेच संकट आहे.

घरगुती ग्राहकांना कंपनीचा दिलासादायक संदेश

दरम्यान, घरगुती गॅस ग्राहकांना एचपीसीएलकडून एक मेसेज पाठवण्यात येत असून, त्यात, "प्रिय ग्राहक, सोशल मीडियावर इंधनाच्या कमतरतेबाबत पसरवले जाणारे दावे खोटे आणि निराधार आहेत. देशात इंधनाची पुरेशी उपलब्धता आहे. नागरिकांनी कोणत्याही प्रकारची चिंता करू नये." असे म्हटले आहे. मात्र, व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा खंडित झाल्याने सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिक यांच्यात प्रचंड अस्वस्थता आहे.

आखाती संघर्षाचा परिणाम कायम राहण्याची शक्यता

आखाती राष्ट्रांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम पुढील काळात अधिक जाणवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुरवठा साखळी पूर्वपदावर येईपर्यंत नागरिक आणि व्यावसायिकांनी संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...