⚡ ब्रेकिंग News

प्राजक्त तनपुरेंची राहुरी पोटनिवडणुकीवर पहिली प्रतिक्रिया; कार्यकर्त्यांचा उल्लेख आणि मुख्यमंत्र्यांचं कौतुक चर्चेत


प्राजक्त तनपुरेंची राहुरी पोटनिवडणुकीवर पहिली प्रतिक्रिया; कार्यकर्त्यांचा उल्लेख आणि मुख्यमंत्र्यांचं कौतुक चर्चेत

"मी शरद पवार गटाचा कार्यकर्ता", पण फडणवीसांच्या कामाचं कौतुक; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

अहिल्यानगर : राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यानंतर माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून, त्यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकीकडे ते स्वतःला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे सांगतात, तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे कौतुक केल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

प्राजक्त तनपुरे म्हणाले, "मी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा कार्यकर्ता आहे. शरद पवार यांच्याबद्दल माझ्या मनात मोठा आदर आहे आणि त्यांचे कार्य कोणीही डावलू शकत नाही. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी सौरऊर्जेच्या बाबतीत केलेल्या कामाचे देखील कौतुक केले पाहिजे." या वक्तव्यामुळे तनपुरे यांच्या मनात नेमके काय आहे, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

कार्यकर्त्यांच्या भावनांनंतरच निर्णय

पोटनिवडणूक लढवण्याबाबत बोलताना तनपुरे म्हणाले, "गावोगावी जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेणार आहे. कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतरच माझा निर्णय जाहीर करेन." या भूमिकेमुळे राहुरीच्या राजकारणात नवे वळण येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कर्डिले विरुद्ध तनपुरे अटीतट?

भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी मिळावी यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत. अक्षय कर्डिले यांनी मुंबईत जाऊन वरिष्ठांच्या गाठीभेटी घेत आपणच प्रबळ दावेदार असल्याचे अधोरेखित केले आहे. दुसरीकडे, प्राजक्त तनपुरे यांची उमेदवारी जाहीर झाल्यास राहुरीत कर्डिले विरुद्ध तनपुरे अशी थेट लढत पाहायला मिळू शकते.

भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडताना म्हटले की, "पक्ष बेरजेच्या राजकारणावर चालतो. एक-एक आमदार महत्त्वाचा असतो. ज्याला जनतेचे समर्थन असेल, त्यालाच मुख्यमंत्री उमेदवारी देतील."

राहुरी पोटनिवडणूक कार्यक्रम:

अधिसूचना जारी : ३० मार्च २०२६

अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख : ६ एप्रिल २०२६

अर्जांची छाननी : ७ एप्रिल २०२६

अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : ९ एप्रिल २०२६

मतदान : २३ एप्रिल २०२६

मतमोजणी : ४ मे २०२६

निवडणूक प्रक्रिया पूर्ण : ६ मे २०२६

निवडणूक आयोगाने या पोटनिवडणुकीसाठी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले असून, आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. प्राजक्त तनपुरे यांच्या वक्तव्यामुळे राहुरीची पोटनिवडणूक आता अधिकच चुरशीची होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...