'महाराष्ट्राच्या नेत्यांमधील खरा बिग बॉस कोण?', अंकिता वालावलकरला प्रश्न; कोकण हार्टेड गर्लच्या उत्तराने वेधले लक्ष
मुलाखतीत अंकिता म्हणाली, "नेतृत्व, निर्णयक्षमता पाहता बिग बॉस म्हणजे..."; मराठी भाषेबाबतही व्यक्त केली भावना
मुंबई : 'बिग बॉस मराठी' फेम आणि 'कोकण हार्टेड गर्ल' म्हणून ओळखली जाणारी इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर हिच्या स्पष्टवक्तेपणाची चर्चा नेहमीच रंगते. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात तिने पती कुणाल भगतसोबत हजेरी लावली होती. यावेळी तिला महाराष्ट्राच्या राजकारणावर एक प्रश्न विचारण्यात आला, ज्याचे उत्तर देऊन अंकिताने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
'लोकमत वृत्तसमूहाच्या महाराष्ट्रीयन ऑफ द इअर' या कार्यक्रमात अंकिता वालावलकर हजर होती. यावेळी तिला विचारण्यात आले, "तुझ्या मते महाराष्ट्राच्या नेत्यांमधील खरा बिग बॉस कोण?" या प्रश्नावर अंकिताने अनेक मराठी माणसांच्या मनातील उत्तर दिले.
ती म्हणाली, "नेतृत्व, निर्णयक्षमता आणि मार्गदर्शक या तीन बाबींचा विचार केला तर, मला वाटतं बिग बॉस म्हणजे आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील..." अंकिताच्या या उत्तराने कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्यांसह चाहत्यांचेही लक्ष वेधले गेले.
मराठी भाषेबाबत काय म्हणाली अंकिता?
याच कार्यक्रमात अंकिताने मराठी भाषेबाबतची तळमळही व्यक्त केली. ती म्हणाली, "आपण आपल्या कुटुंबात मराठी भाषा जपली पाहिजे. सगळ्यांच्या भाषांचा आदार करून आपण आपली भाषा टिकवली पाहिजे." महाराष्ट्रातील विविध बोलीभाषांबाबत बोलताना ती म्हणाली, "महाराष्ट्रात खूप बोलीभाषा आहेत. बिग बॉसमध्येच आपण वेगळी भाषा पाहिली, जी मलाही नवीन होती. तशीच मालवणी भाषा आहे. या सगळ्या बोलीभाषा मराठीच्या उपभाषा आहेत. आपल्याकडे भाषांमध्येही विविधता आहे. प्रत्येक भाषा जपत-जपत आपण मराठी भाषा जपली पाहिजे."
अंकिता वालावलकर ही 'बिग बॉस मराठी सीझन ५' मधून प्रसिद्धीझोतात आली. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये तिने संगीतकार कुणाल भगतसोबत लग्न केले. तिची स्पष्टवक्ते शैली आणि मराठी भाषेविषयीची आत्मीयता नेहमीच चर्चेत असते.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.