जळगाव: अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू झालेल्या संघर्षाचा थेट परिणाम जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांवर झाला आहे. युद्धामुळे आखाती देशांमध्ये होणारी केळी निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. रमजान महिन्याच्या काळात केळीला असलेली प्रचंड मागणी आता कोलमडल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.
जळगाव जिल्ह्यातून सध्या दररोज सुमारे १२ कंटेनर केळी आखाती देशांसह इतर मुस्लिम राष्ट्रांमध्ये पाठवली जात होती. मात्र, युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यातीवर पूर्णविराम लागला आहे. याचा सर्वाधिक फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून निर्यात रखडल्याने लाखो रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
युद्ध सुरू होण्यापूर्वी केळीला प्रतिक्विंटल २५०० रुपये असा भाव होता. मात्र, आता हा दर कोसळून केवळ १५०० रुपये प्रतिक्विंटल इतका झाला आहे. निर्यात बंद झाल्याने बाजारात केळीचा साठा वाढला असून दरातील ही घसरण शेतकऱ्यांसाठी दुहेरी संकट घेऊन आली आहे. शेतकऱ्यांनी केंद्र सरकारकडे तातडीने हस्तक्षेप करून निर्यात सुरळीत करण्यासाठी आणि त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत करण्याची मागणी केली आहे.
कोल्हापूरकरांची चिंता वाढली
दरम्यान, आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे १५० नागरिक विविध ठिकाणी अडकले आहेत. यापैकी १३० जणांची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली असून ते सर्व सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष या नागरिकांच्या संपर्कात असून त्यांना आवश्यक ती मदत केली जात आहे.
दुबईत अडकले पुण्यातील पर्यटक
युद्धामुळे दुबईतील विमानतळावरील उड्डाणे रद्द झाल्याने पुण्यातील सुमारे ४० पर्यटक देखील तेथे अडकले आहेत. हे सर्व पर्यटक आज भारतात परतणार होते; मात्र अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे त्यांना दुबईतच थांबावे लागले आहे. आपल्याला भारतात परतण्यासाठी किती दिवस लागतील, या अनिश्चिततेमुळे त्यांच्यात भीतीचे वातावरण आहे. दुबई प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत केली जात असली तरी परत येण्याची ओढ आणि वाढती चिंता यामुळे पर्यटक हैरान झाल्याचे समोर आले आहे.
.jpg)
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.