पुंछ (जम्मू-काश्मीर): एकीकडे अफगाणिस्तानच्या सीमेवर सुरू असलेल्या संघर्षामुळे पाकिस्तानची आर्थिक आणि लष्करी कणा मोडकळीस आला असताना, दुसरीकडे भारताच्या विरोधातील त्यांचे छुपे युद्ध थांबण्याचे नाव घेत नाहीये. जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ (LoC) पुन्हा एकदा पाकिस्तानी ड्रोनने भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय लष्कराच्या सतर्क जवानांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे पाकिस्तानचा हा कट सपशेल अपयशी ठरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे ६ वाजून १० मिनिटांच्या सुमारास पुंछमधील दिगवार परिसरात तैनात असलेल्या एका सैनिकाला आकाशात संशयास्पद हालचाल दिसली. सुमारे १५ मिनिटे हे ड्रोन भारतीय सीमेच्या अगदी जवळ घिरट्या घालत होते. धोक्याची जाणीव होताच भारतीय जवानांनी त्या ड्रोनच्या दिशेने सपासप गोळीबार सुरू केला. लष्कराचा आक्रमक पवित्रा पाहून पाकिस्तानी ड्रोनने तातडीने पळ काढला आणि ते पाकव्याप्त काश्मीरच्या (PoK) दिशेला परतले.
तीन दिवसांतील दुसरी घटना; सुरक्षा दले सतर्क
विशेष म्हणजे, गेल्या ७२ तासांतील ही दुसरी मोठी घुसखोरीची घटना आहे. याआधी २७ फेब्रुवारी रोजी देखील अशाच प्रकारे एका ड्रोनने भारतीय हद्दीत शिरकाव करण्याचा प्रयत्न केला होता. वारंवार होणाऱ्या या ड्रोन हल्ल्यांमुळे सुरक्षा यंत्रणांनी हाय-अलर्ट जारी केला आहे. हे ड्रोन केवळ हेरगिरीसाठी होते की त्यातून शस्त्रे किंवा अमली पदार्थांची (ड्रग्ज) तस्करी करण्याचा डाव होता, याचा तपास सध्या सुरू आहे.
मोठं सर्च ऑपरेशन सुरू
ड्रोन परतले असले तरी, खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय लष्कराने दिगवार आणि आसपासच्या परिसरात व्यापक शोधमोहीम (Search Operation) हाती घेतली आहे. सीमेजवळील जंगलात किंवा निवासी भागात ड्रोनद्वारे कोणतेही घातक साहित्य ‘एअरड्रॉप’ करण्यात आले आहे का, याची बारकाईने तपासणी केली जात आहे. संशयास्पद वस्तू आढळल्यास तातडीने कळवण्याच्या सूचना स्थानिक नागरिकांनाही देण्यात आल्या आहेत.
पाकिस्तानचे 'ड्रोन' तंत्र आणि भारताचे उत्तर
गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानने भारताच्या अंतर्गत भागात अशांतता पसरवण्यासाठी ड्रोनचा वापर वाढवला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला कठुआ जिल्ह्यातही सुमारे पाच मिनिटे ड्रोन घिरट्या मारताना दिसले होते, तर सांबा जिल्ह्यातही बीएसएफच्या (BSF) जवानांनी अशाच प्रकारची घुसखोरी उधळून लावली होती. एकीकडे पाकिस्तान स्वतःच्या अंतर्गत यादवी आणि अफगाणिस्तान सीमेवरील युद्धात होरपळत असताना, भारताच्या सीमावर्ती भागात कुरापती काढून लक्ष विचलित करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचे संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे.
.jpg)
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.