गटनेतेपदी राजेश्वरी नाईक, उपनेतेपदी विनायकराव मासाळ यांची निवड; संघटन मजबूत करण्यासाठी नव्या समीकरणाला सुरुवात
सांगली क्रांती न्यूज : जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नव्या नेतृत्वाची घोषणा करत राजकीय समीकरणेच बदलून टाकली आहेत. पक्षाच्या गटनेतृत्वपदी सौ. राजेश्वरी रणधीर नाईक यांची तर उपनेतेपदी विनायकराव मासाळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. याशिवाय पक्षप्रतोदपदी सौ. स्नेहल मोरे यांना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच विनायकराव मासाळ यांचे नाव अग्रक्रमाने मांडत त्यांना उपनेतेपदाची संधी देण्यात आली, जी राष्ट्रवादीच्या जिल्हा राजकारणातील निर्णायक वाटचाल मानली जात आहे.
या निवडीमुळे जिल्हा परिषदेत मासाळ यांची भूमिका आता निर्णायक ठरणार असून, कार्यकर्त्यांसह वरिष्ठ नेत्यांमध्ये याबाबत उत्साहाचे वातावरण आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांशी असलेला संवाद, प्रशासनाचा अभ्यास आणि संघटन कौशल्य यामुळे मासाळ यांच्याकडे भविष्यातील प्रभावी नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे.
नवनियुक्त गटनेतेपदी सौ. राजेश्वरी रणधीर नाईक यांनी सांगली जिल्हा परिषदेत विकासाभिमुख, पारदर्शक आणि आक्रमक भूमिका घेतली जाईल, असा विश्वास व्यक्त केला. तर उपनेते विनायकराव मासाळ म्हणाले, "सर्व सदस्यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील प्रश्न सोडविण्यासाठी आणि पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहू."
या निवडीप्रसंगी शिवाजीराव नाईक, अजितराव घोरपडे, संजय काका पाटील, निशिकांत दादा भोसले-पाटील, राजेंद्र आण्णा देशमुख, तमन्नगौडा रवी पाटील, रणधीर नाईक, अनिलशेठ पाटील, हर्षवर्धन देशमुख यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य, पदाधिकारी आणि पक्षाचे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित नेत्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले.
राजकीय वर्तुळात या निवडीकडे सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या नव्या शक्तिकेंद्राची सुरुवात म्हणून पाहिले जात असून, जिल्हा परिषदेत आगामी काळात पक्ष अधिक आक्रमक आणि प्रभावी भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.