इराण-इस्रायल युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची दक्षता
गॅस वितरकांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर वितरक आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षा देण्याचे आदेश
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन; पुरवठा सुरळीत राहण्यासाठी उपाययोजना
मुंबई: इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात इंधन टंचाईचे संकट उभे राहिले असून, भारतातही गॅसचा तुटवडा (Gas Shortage) जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गॅस एजन्सी आणि सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या गाड्यांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
गॅस वितरकांवरील हल्ल्यांनंतर निर्णय
काही ठिकाणी गॅस वितरकांवर हल्ले होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे वितरकांसह वितरण कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याच्या सूचना अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात विभागाने परिपत्रक काढले असून, गॅस स्थिती पूर्वस्थितीवर येईपर्यंत हे धोरण लागू असेल, असे स्पष्ट केले आहे.
जिल्हास्तरावर समिती स्थापन
पुरवठा सुरळीत राहावा यासाठी जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात येत असून, त्यात पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्त सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. या समितीमार्फत गॅस पुरवठ्याच्या स्थितीवर लक्ष ठेवले जाणार आहे.
पुण्यात गॅससाठी मोठ्या रांगा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात कोणतीही गॅस टंचाई नसल्याचे वारंवार सांगितले असले, तरी नागरिकांमध्ये मात्र चिंतेचे वातावरण आहे. सोमवारी पुण्यातील अनेक भागांमध्ये घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या. सकाळपासूनच नागरिक गॅस एजन्सीबाहेर रांगेत उभे राहिल्याचे दिसून आले.
मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे वागावे. काही राजकीय पक्ष जाणीवपूर्वक नागरिकांमध्ये भीती निर्माण करत आहेत. पॅनिक सिच्युएशनमुळे लोक गॅसची साठवणूक करतील आणि असलेली चांगली परिस्थिती खराब होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.