सांगलीत जल्लोषाच्या नावाखाली धिंगाणा, दुकानाच्या बोर्डाला आग; अकोल्यात दोन समुदायांत राडा-दगडफेक
सांगली / अकोला : टीम इंडियाने न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करत टी-२० विश्वचषक २०२६ जिंकला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने हा ऐतिहासिक विजय मिळवत तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरले. मात्र, या विजयाचा जल्लोष साजरा करताना काही ठिकाणी गोंधळाचे प्रकार घडल्याने विजयाला गालबोट लागले आहे.
सांगलीत धक्कादायक प्रकार
सांगलीच्या मारुती चौकात तरुणांनी जल्लोषाच्या नावाखाली हुल्लडबाजी केली. हातात फटाके घेऊन फोडताना एका दुकानाच्या बोर्डाला आग लागली. यानंतर आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाची गाडी अडवून तरुणांनी बळजबरीने सायरन वाजवण्यासाठी दबाव आणला. परिस्थिती हाताबाहेर जाताच पोलिसांनी काठ्या हातात घेत जमावाला पांगवले आणि परिसरात शांतता प्रस्थापित केली.
अकोल्यात दोन समुदायांमध्ये राडा
दुसरीकडे, अकोल्यातील हरिहरपेठ भागात दोन समुदायांमध्ये जोरदार राडा झाला. फटाके फोडण्यावरून सुरू झालेला वाद इतका विकोपाला गेला की, दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली. या हिंसाचारात दोन ते तीन नागरिक आणि काही पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले. तसेच दोन-चार चाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली. जखमी झालेल्या सारंग गीते या तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अकोला पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. हरिहरपेठ भागात अडीच वर्षांपूर्वीही दोनदा दंगल झाली होती. या प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस 'कोंबिंग ऑपरेशन' राबविणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.