राष्ट्रीय महामार्गावरील ८ वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याच्या कामामुळे अपघातांची मालिका सुरू; ग्रामस्थ आक्रमक
म्हसवड (दि. २७) : सातारा ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील धुळदेव गावाच्या हद्दीत आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले, तर तीन जण गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना सातारा येथील डॉ. क्रांतिसिंह रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सातारा (कोडोली) येथील निकम कुटुंबीय देवदर्शनासाठी पंढरपूरला आपल्या आल्टो कारने निघाले होते. सकाळी ९ नंतर म्हसवडहून पंढरपूरकडे जात असताना धुळदेव गावाच्या हद्दीत रस्ता उखडलेला असल्याने चालकाला अंदाज न आल्याने त्याने अचानक ब्रेक दाबला. यामुळे आल्टो कार तीन-चार पलट्या खाल्या. या अपघातात कारमधील दोन प्रवासी जागेवरच ठार झाले, तर तीन जण गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच धुळदेव गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले आणि म्हसवड पोलिसांना सूचना दिली. पो. कॉ. अभिजीत भादुले, पो. ना. लुबाळ आणि पो. हवा. हांगे यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. ग्रामस्थांच्या मदतीने १०८ रुग्णवाहिकेद्वारे जखमींना प्रथम म्हसवड येथील संचित रुग्णालयात आणण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना सातारा येथील डॉ. क्रांतिसिंह रुग्णालयात हलवण्यात आले.
दरम्यान, या अपघाताने धुळदेव ग्रामस्थ संतापले आहेत. त्यांचा आरोप आहे की, सातारा-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील धुळदेव हद्दीतील रस्त्याचे काम गेल्या ८ वर्षांपासून रस्ते विकास महामंडळाकडून रखडवले गेले आहे. या कामासाठी ग्रामस्थांनी अनेकदा आंदोलने केली, मात्र प्रशासनाने केवळ बोळवण केली. यामुळे या ठिकाणी अपघातांची मालिका सुरूच आहे. आतापर्यंत या ठिकाणी जवळपास २० जणांचा जीव गेला असून, ३०० हून अधिक छोटे-मोठे अपघात झाले आहेत.
ग्रामस्थांनी संतप्त भावनेने विचारले आहे की, “आणखी किती जणांचा जीव गेल्यावर प्रशासनाला या रस्त्याच्या कामाची जाणीव होणार?”
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.