पश्चिम आशियातील युद्धामुळे इंधन टंचाईच्या अफवांना उधाण आल्याने नागरिकांनी पेट्रोल पंपावर गर्दी केली आहे. या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यांमध्ये प्रशासनाने इंधन विक्रीवर मर्यादा लावल्या आहेत.
पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात इंधन टंचाईचे संकट उभे राहिले आहे. युद्धाचा थेट फटका जागतिक अर्थव्यवस्थेला बसत असून, भारतात एलपीजी गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठाही काही अंशी धीम्या गतीने होत आहे. समाज माध्यमांवरील अफवांमुळे नागरिकांनी पेट्रोल पंपांवर एकच गर्दी केल्याचे चित्र आहे. अशातच आता राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये प्रशासनाने इंधन विक्रीवर नियम लागू केले आहेत.
छत्रपती संभाजीनगर : दुचाकीला २००, चारचाकीला हजार रुपये
छत्रपती संभाजीनगर शहरात पेट्रोल पंपांवर वाढलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पुरवठा विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी घाबरून मोठ्या प्रमाणात इंधन साठवण्याचा प्रयत्न केल्याने काही ठिकाणी तात्पुरती टंचाई निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने दुचाकी वाहनांना जास्तीत जास्त २०० रुपये आणि चारचाकी वाहनांना हजार रुपयांपर्यंतच इंधन देण्याचे आदेश पेट्रोल पंप चालकांना दिले आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आवश्यकतेनुसारच इंधन भरावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नांदेड : दुचाकीला ३००, चारचाकीला दीड हजार रुपये
युद्धामुळे इंधन विक्री बंद होणार असल्याच्या अफवा मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या अफवेमुळे नांदेडच्या पेट्रोल पंपांवर वाहनधारक मोठी गर्दी करीत आहेत. अनेकजण अनावश्यक पेट्रोल खरेदी करताना दिसत आहेत. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने पेट्रोल खरेदीवर नियम लागू केले आहेत. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी पेट्रोल पंप चालकांना दुचाकीधारकांना ३०० रुपये तर चारचाकी वाहनधारकांना दीड हजार रुपये इंधन देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
परभणी : दुचाकीला २००, चारचाकीला दोन हजार रुपये
परभणी शहरासह जिल्हाभरामध्ये इंधनासाठी नागरिक पेट्रोल पंपांवर गर्दी करत असल्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे यांनी इंधन विक्रीवर मर्यादा लावली आहे. परभणी जिल्ह्यात आता दुचाकीला दोनशे रुपयांचे इंधन तर चारचाकीला दोन हजार रुपयांचे इंधन दिले जाणार आहे. याशिवाय अतिरिक्त कोणालाही इंधन दिले जाणार नाही. तसेच बॉटल, कॅन, टाकी यामध्ये इंधन देण्यावरही प्रशासनाने बंधन लावले आहे. जिल्ह्यामध्ये इंधनाचा पुरेसा साठा असून कोणीही इंधन नसल्याची अफवा पसरवू नये, असेही जिल्हा पुरवठा अधिकारी मुसळे यांनी स्पष्ट केले आहे.
तुमच्या शहरात काय स्थिती?
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये प्रशासनाकडून अशा प्रकारचे नियम लागू करण्यात आले आहेत. नागरिकांनी अफवांना बळी न पडता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. इंधन पुरवठ्याबाबत कोणतीही अफवा पसरवल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, याचीही दक्षता प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.